दर घसरल्याने चिंचांचा आंबटपणा झाला कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:30 IST2021-02-14T04:30:00+5:302021-02-14T04:30:00+5:30
तामलवाडी : यंदा पाऊस काळ मुबलक झाल्याने चिंचेचा झाडाला फळ भरपूर लगडले आहे. परंतु, रोगामुळे चिंचाची फुगवण झाली नाही. ...

दर घसरल्याने चिंचांचा आंबटपणा झाला कमी
तामलवाडी : यंदा पाऊस काळ मुबलक झाल्याने चिंचेचा झाडाला फळ भरपूर लगडले आहे. परंतु, रोगामुळे चिंचाची फुगवण झाली नाही. शिवाय, बाजारात फोडलेल्या चिंचाला केवळ सहा ते सात हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. असल्याने व्यापाऱ्यांत नाराजी आहे. दरम्यान, फेब्रुवारी महिन्यापासून चिंचेच्या फळझाडणीस सुरवात झाली असून, या माध्यमातून तुळजापूर तालुक्यातील सांगवी (काटी) परिसरात जवळपास पंधरा महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे. गतवर्षी मार्च महिन्यात कोरोनाच्या, लॉकडाऊन मुळे चिंच व्यावसाय अडचीणत आला होता. बाजारपेठा बंद पडल्याने फोडलेल्या चिंचा विकायच्या कुठे, असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी व्यापाऱ्यांना गुपचूप बोलावून काहींनी कवडीमोल कवडीमोल दराने चिंच व चिंचोक्यांची विक्री केली. दरम्यान, यंदा पाऊस चांगला झाल्याने झाडाला चिंचाचे फळ भरपूर लगडले आहे. तुळजापूर तालुक्यातील सांगवी, सावरगाव, मांळुब्रा, सुरतगांव, पिंपळा, होनसळ, राळेरास, धोत्री देवकुरूळी, काटी, सिंदफळ शिवारात चिचांची झाडे मोठ्या प्रमाणावर असून, फळही चांगले आहे. ही झाडे व्यापारी शेतकऱ्याकडून ठेका पध्दतीने विकत घेतात. त्यापोटी शेतकऱ्याला झाडाचे फळ पाहून ५ हजार ते १५ हजारापर्यत रक्कम दिली जाते. फेबुवारी महिन्यापासून फळ तोडणीस सुरवात झाली आहे. झाड विकत घेतल्यानंतर फळ झाडणी, चिचा फोडणी, वाहतूक इत्यादी खर्च व्यापाऱ्याला करावा लागतो. परंतु, यंदा मात्र बाजारात फोडलेल्या चिंचाला सहा ते सात हजार तर चिंचोक्याला सात ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. त्यामुळे हा सर्व खर्च करून मिळणारा हा दर अत्यल्प असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
चौकट
पापडी रोगाचा प्रादुर्भाव
आक्टोबर महिन्यातील अतिवृष्टीनंतर चिंचेच्या झाडाला लागलेल्या फळावर पापडी रोगाचा प्रादुर्भाव पडला आहे. यामुळे फळाची फुगवण झाली नाही. परिणामी उतारा घटला आहे. ढासळलेला भाव, झाडाला मिळणारा उतारा पाहता पदरात म्हणावा तेवढा फायदा मिळत नसल्याचे व्यापारी किसन सुरते यानी सांगीतले.
शाळकरी मुलाचा हातभार
सघा शाळाना सुरवात झाली तरी दुपारी २ नंतर शाळकरी मुले रिकाम्या वेळेत आईला चिंचा फोडणीसाठी हातभार लावताना दिसत आहेत. त्यामुळे मजुरीच्या मिळणाऱ्या पैशात वाढ होताना दिसत आहे चिंचा फोडणीची कामे तामलवाडी भागातील खेडेगावात सुरू असल्याचे दिसत आहेत
घरबसल्या रोजगार
चिंचा फोडणीसाठी प्रतिकिलो १० रूपये भाव मजूर महिलांना दिला जातो. एक महिला मजूर घरकाम पाहत मिळेल त्या वेळेत १५ ते २० किलो चिंचा फोडून दिवसाला दीड-दोनशे रुपये रोजगार घेत आहे. सांगवी येथे यातून १० ते १५ महिलांनाघरबसल्या रोजगार उपलब्ध झाला आहे. चार महिने हा चिंचा फोडणीचा मौसम चालू राहणार आहे