बालेकिल्ल्यात वाढली काँग्रेसची पडझड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:22 IST2021-06-28T04:22:36+5:302021-06-28T04:22:36+5:30
लोहारा : शहरातील काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर आता युवक काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष, पंचायत समितीचे दोन माजी ...

बालेकिल्ल्यात वाढली काँग्रेसची पडझड
लोहारा : शहरातील काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर आता युवक काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष, पंचायत समितीचे दोन माजी सदस्य व ग्रामपंचायतच्या एका माजी सदस्यासह सहा जणांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. त्यामुळे बाल्लेकिल्यातच काँग्रेसच्या पडझडीत वाढ असल्याचे चित्र आहे.
लोहारा शहर हे तालुक्याचे ठिकाण असल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात ग्रामपंचायतला नगरपंचायतचा दर्जा मिळाला. यामुळे गावस्तरावरील गटातटाचे राजकारण राजकीय पक्षावर आले. शहरात प्रथमच पक्षाच्या चिन्हावर निवडणुका झाल्या. यात शिवसेनेला यश मिळाले. यामुळे सेनेची सत्ता स्थापन होणार हे स्पष्ट असताना काँग्रेसने सेनेतील एक व अपक्ष नगरसेवकाच्या मदतीने राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेत सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू केल्या. मात्र, त्यात यश आले नाही. शेवटी सेनेने राष्ट्रवादीला सोबत घेत सत्ता स्थापन केली. अडीच वर्षांत बऱ्याच राजकीय हालचाली झाल्या. कालांतराने सेनेच्या नगरसेवकाचा एक गट काँग्रेसच्या सोबत आला आणि काँग्रेसच्या मदतीने सत्ता स्थापन करीत सेनेला सत्तेबाहेर ठेवले. या सत्ता स्थापनेनंतर वर्षातच अंतर्गत हेवेदावे वाढले. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरूच राहिले. त्यातच नगरपंचायतमध्ये काँग्रेस अडीच वर्षे सत्तेत असताना पक्षाच्या नगरसेवकांची कामे होत नसल्याचा आरोप काँग्रेसच्याच काही नगरसेवकांतून करण्यात येत होता. शहरात पक्षाचे प्राबल्य मोठ्या प्रमाणात असताना गट-तट होते आणि आजही आहेत.
दरम्यान, शहरातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, तालुका समन्वय समितीचे माजी अध्यक्ष नागाण्णा वकील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत नुकताच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. यापाठोपाठ युवक काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष अविनाश माळी, पंचायत समितीचे माजी सदस्य दीपक रोडगे, हिप्परगा (रवा) गटातील पं. स. चे माजी सदस्य इंद्रजित लोमटे व लोहारा ग्रामपंचायतीचे माजी सदस्य श्रीशैल स्वामी, राजेंद्र माळी, अमोल माळी या सहा जणांनी घरगुती कारण पुढे करीत आपल्या सदस्यत्वाचे राजीनामे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांच्याकडे दिले. यामुळे काँग्रेसच्या बाल्लेकिल्यातच काँग्रेसची पडझड वाढल्याचे दिसत आहे. आता राजीनामा दिलेले हे सहा जण कोणत्या पक्षाचा झेंडा हातात घेणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.