प्रवासी संख्या रोडावली तरीही एसटीची चाके गतिमानच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:32 IST2021-04-08T04:32:44+5:302021-04-08T04:32:44+5:30
उस्मानाबाद : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे एसटी बसला प्रवाशांची संख्या घटली आहे. त्यामुळे १०० गाड्या बंद झाल्या असून, सध्या २२५ ...

प्रवासी संख्या रोडावली तरीही एसटीची चाके गतिमानच
उस्मानाबाद : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे एसटी बसला प्रवाशांची संख्या घटली आहे. त्यामुळे १०० गाड्या बंद झाल्या असून, सध्या २२५ बसेस विविध मार्गांवर धावत आहेत. या बसेसला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या उस्मानाबाद विभागाच्या एकूण सहा आगाराच्या ४५० बसेस आहेत. गतवर्षी लॉकडाऊन काळात दोन महिने बसेस बंद होत्या. त्यानंतर मे महिन्यात ५० टक्के प्रवासी क्षमतेनुसार बसेस धावू लागल्या. दिवाळी सणापासून बसेसला प्रवाशांचा प्रतिसाद वाढू लागला. त्यामुळे ५४० पैकी ३५० बसेस सुरु झाल्या होत्या. पुन्हा मार्च महिन्यात रुग्णांचा आकडा वाढू लागला. वाढत्या रुग्णांमुळे प्रवासी प्रवास करणे टाळत आहेत. परिणामी, महामंडळाने बसच्या फेऱ्या कमी केल्या आहेत. सध्या २२५ बस गाड्यांच्या ८०० फेऱ्या होत आहेत. यातून एसटीला प्रतिदिन २० लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे, तर २२५ बसेस अद्याप डेपोतच थांबून आहेत.
एकूण नुकसान ८२ कोटी
चालक १०१५
वाहक ९३०
एकूण कर्मचारी २५००
रोजच्या बसफेऱ्या ८००
नुकसानीचा आकडा सातत्याने वाढतोय
गेले वर्ष तोट्याचेच
गेल्या वर्षी २ महिने बसेस डेपातच थांबून होत्या. या काळात प्रतिदिन ५० लाख रुपयांचा फटका महामंडळास बसला होता. त्यानंतर बसेस सुरु झाल्या तरी दिवसाकाठी २० लाख रुपये उत्पन्न कमीच येत आहे. वर्षभरात ८२ कोटीचा फटका एसटीला झाला.
शाळा बंद झाल्याने शंभर बसेस बंद
जिल्ह्यातील विविध मार्गांवर ३२५ ते ३५० बसेस धावत होत्या. शाळा, महाविद्यालये बंद झाल्याने सध्या १०० बस गाड्या बंद करण्यात आल्या आहेत. शिवाय, जिल्ह्यात दर रविवारी जनता कर्फ्यू लागू असल्याने रविवारी बसला प्रवाशांचा प्रतिसाद कमी असतो. त्याचबरोबर इतर दिवशीही विविध मार्गांवर प्रवाशांचा प्रतिसाद कमी असल्यानंतर बस फेरी रद्द करण्यात येते.
सध्या प्रवासी संख्या कमी झाली असल्याने ७२ पैकी २६ बसेस बंद करण्यात आल्या आहेत. ४४ बस गाड्या सुरु आहेत. बसमध्ये मास्कशिवाय प्रवाशांना प्रवेश दिला जात नाही. तसेच बसचे निर्जंतुकीकरण केले जात आहे.
पी. एम. पाटील, आगार प्रमुख