ग्रामीण भागातही कोरोनाचा विळखा होतोय घट्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:33 IST2021-04-01T04:33:08+5:302021-04-01T04:33:08+5:30

मुरुम : शहरातील विविध भागात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील रुग्ण संख्या अकरावर पोंहचली आहे. आलूर प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या पाच ...

Even in rural areas, the corona is getting stronger | ग्रामीण भागातही कोरोनाचा विळखा होतोय घट्ट

ग्रामीण भागातही कोरोनाचा विळखा होतोय घट्ट

मुरुम : शहरातील विविध भागात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील रुग्ण संख्या अकरावर पोंहचली आहे. आलूर प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या पाच गावात नऊ रुग्ण नव्याने आढळून आले असून, या आजाराने केसरजवळगा येथील एका ७० वर्षी महिलेचा उपचारादरम्यान सोलापूर येथे मृत्यू झाला आहे. शिवाय, या महिलेच्या संपर्कातील तीनजण बुधवारी रॅपिड ॲटीजेन चाचणीतून कोरोना बाधित आढळले.

मागील वर्षी मार्च महिन्यानंतर राज्यासह देशात कोरोनाने थैमान घातले होते. जवळपास आठ महिन्यानंतर पुन्हा कोरोनाने उग्र रुप धारण केले आहे. मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नांदेड, नाशिक, औरंगाबाद या मेट्रो शहरासह ग्रामीण भागातही कोरोनाचे दुसऱ्या लाटेतील रुग्ण आढळून येत आहेत. बहुतांश शहरातील बेड हाऊसफुल्ल झाले असल्याने प्रशासनाकडून खासगी रुग्णालयातील बेडही ताब्यात घेतले जात आहेत. दरम्यान, दुसऱ्या लाटेत मुरुम शहरात आतापर्यंत ११ रुग्ण आढळून आले आहेत. शहरातील यशवंतनगर नगर भागात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. यानंतर यशवंतनगर मध्ये पुन्हा दोन रुग्ण आढळून आले. अशोक चौक तीन, मुदकण्णा गल्ली दोन, नेहरुनगर, मेनरोड, नगरपरिषद परिसर, झुरळे गल्ली, सुभाष चौक असे प्रत्येकी एक रुग्ण आत्तापर्यंत शहरात आढळले आहेत. यापैकी पाच जणांना उपचारानंतर बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले असून, सध्या सहा रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरु आहेत. याशिवाय, केसरजवळगा येथे चार, कदेर दोन, आलूर, कोथळी, बेळंब येथे प्रत्येकी एक असे नऊ रुग्ण आढळून आले आहेत. परिसरातील भुसणी, दाळिंब, तुगाव आदी गावातही कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरी भागासह ग्रामीण भागातही दिवसागणिक कोरोणा रुग्णांची संख्या वाढत आहे. एकीकडे सूर्य आग ओकत असताना दुसरीकडे कोरोनाने डोके वर काढल्याने कोरोनाचे निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत. आठवडे बाजार बंद असून, जनता कर्फ्युही कडकडीतपणे पाळण्यात येत आहे. ज्या भागात कोरोनाचे रुग्ण आढळून आले त्या भागात नगरपरिषदेकडून औषध फवारणी करुन सर्वे केला जात आहे.

दरम्यान, केसरजवळगा येथील एका महिलेला अस्वस्थ वाटू लागल्याने २७ मार्च रोजी सोलापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान २८ मार्च रोजी त्यांचे निधन झाले. संबंधीत महिलेवर कोविड नियमावली नुसार सोमवारी केसरजवळगा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले होते. या महिलेच्या जवळून संपर्कात असलेल्या लोकांची चाचणी केल्यानंतर बुधवारी तीन रुग्णांची भर पडली. त्यामुळे केसरजवळगा येथे एकाच दिवसात तीन रुग्ण आढळून आले. आलूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.महेश बेंबळगे यांनी हा भाग कंटेनमेंट झोन म्हणून जाहिर केला आहे. नव्याने आढळलेल्या रुग्णांच्या संंपर्कातील लोकांना क्वारंटाईन करण्यात आले असून, त्यांची माहिती घेण्याचे काम सुरु असल्याचे डॉ.महेश बेंबळगे यांनी सांगितले.

Web Title: Even in rural areas, the corona is getting stronger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.