खेड्यांतही घरकुलासाठी अडीच लाख द्या; कलेक्टर ऑफिससमोर लाेटांगण आंदाेलन
By बाबुराव चव्हाण | Updated: October 19, 2023 18:14 IST2023-10-19T18:14:12+5:302023-10-19T18:14:49+5:30
ग्रामीण भागात अनेक कुटुंब गावात जागा नसल्याने गावठाणातील जागा धरून वास्तव्य करताहेत.

खेड्यांतही घरकुलासाठी अडीच लाख द्या; कलेक्टर ऑफिससमोर लाेटांगण आंदाेलन
धाराशिव -ग्रामीण भागातील गावठाणात वास्तव्य करणाऱ्या कुटुंबांना घरकुल बांधकामास परवानगी द्यावी, घरकुलासाठी शहराप्रमाणे शासनाने अडीच लाख रूपये द्यावेत आदी मागण्यांसाठी अखिल भारतीय मजदूर सेवा संघाच्या वतीने गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या द्वारी लाेटांगण आंदाेलन करण्यात आले.
ग्रामीण भागात अनेक कुटुंब गावात जागा नसल्याने गावठाणातील जागा धरून वास्तव्य करताहेत. मात्र, तिथे घरकुल याेजनेतून घर बंधकामास परवानगी दिली जात नाही. शहराप्रमाणे ग्रामीण भागातही परवानगी देण्यात यावी, घरकुलासाठी शहरात अडीच लाख रूपये दिले जातात. ग्रामीण भागात अवघे १ लाख २५ हजार मिळतात. ही रक्कम वाढवून अडीच लाख करण्यात यावी आदी मागण्यांसाठी अखिल भारतीय मजदूर सेवासंघाच्या वतीने गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर धरणे आंदेालन करण्यात आले. यानंतर परिसरातच लाेटांगण आंदाेलनही करण्यात आले. आंदाेलनात अशाेक बनसाेडे, अमित बनसाेडे, दत्तात्रय शिताेळे, विजय शिताेळे, संताेष शिताेळे, सचिन शिंदे, शेख महेबूब वजीर, आकाश चव्हाण यांच्यासह पदाधिकारी उपस्थित हाेते.