ह्रदयरोग, ॲलर्जी असली तरी कोरोना लस घ्यायला हवी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:57 IST2021-03-13T04:57:04+5:302021-03-13T04:57:04+5:30
उस्मानाबाद : ह्रदयरोगी, किडनीचा विकार असलेले, दुर्धर आजार असा कुठलाही आजार असलेल्या सर्वांनी कोरोना प्रतिबंधक लस घ्यायला हवी, असे ...

ह्रदयरोग, ॲलर्जी असली तरी कोरोना लस घ्यायला हवी !
उस्मानाबाद : ह्रदयरोगी, किडनीचा विकार असलेले, दुर्धर आजार असा कुठलाही आजार असलेल्या सर्वांनी कोरोना प्रतिबंधक लस घ्यायला हवी, असे मत तज्ज्ञ डाॅक्टरांनी व्यक्त केले.
जिल्ह्यात एक मार्चपासून जिल्ह्यातील ९ शासकीय रुग्णालयातील केंद्रावर ६० वर्षांपुढील वयोगटातील तसेच दुर्धर आजाराच्या रुग्णांच्या लसीकरण मोहिमेस प्रारंभ झाला. २ मार्चपासून सहा खासगी रुग्णालयातील केंद्रावर लसीकरणास सुरुवात झाली आहे. ज्येष्ठ नागरिक मोठ्या स्वंयमस्फूर्तीने लस टोचून घेत आहेत. ४५ ते ५९ वयोगटांतील ह्रदयरोगी, किडनी विकार असलेले, मधुमेह, कॅन्सर, जुनाट आजाराने ग्रस्त रुग्ण लसीबाबत अकारण भीती बाळगून लस टोचून घेण्यास धजावत आहेत. शिवाय, दुर्धर आजाराने ग्रासलेले रुग्णही डॉक्टरांकडे कोरोना लसीच्या सुरक्षेविषयी विचारपूस करताना आढळून येत आहेत. लसीच्या सुरक्षेबाबत तसेच दुर्धर आजाराच्या रुग्णांच्या लसीकरणाबाबत तज्ज्ञ डॉक्टरांच्या प्रतिक्रिया लोकमतने जाणून घेतल्या. यावेळी डॉक्टरांनी सांगितले की, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लस प्रभावी असून, कोरोना रुग्ण वाढीस ब्रेक बसण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसह दुर्धर आजार असलेल्या सर्वांनी लस टोचून घ्यायला हवी, असे मत व्यक्त केले.
काय म्हणतात तज्ज्ञ डॉक्टर
ह्रदयविकार, महुमेह असलेल्या व्यक्ती, तसेच जुनाट आजार असलेल्या व्यक्तींना कोरोना संसर्गाचा धोका अधिक असतो. या रुग्णांनी लस घेणे गरजेचे आहे. लस घेतल्यानंतर गुंतागुतीचा धोका टळतो. डाॅ. राज गलांडे,
महुमेह, ह्रदयविकार तज्ज्ञ,
महुमेह रुग्णांचा आजार नियंत्रणात असेल तर लस घेण्यास काहीच अडचण नाही. सध्या कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी लसच प्रभावी आहे. लस घेतल्यानंतर प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
डाॅ. किरण पोतदार,
महुमेह विकार तज्ज्ञ, उस्मानाबाद
जुनाट आजार असलेल्या व्यक्तींनी सर्वात प्रथम लस घेणे महत्त्वाचे आहे. लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर प्रतिकारशक्ती वाढते. त्यामुळे पुढे काेराेना झाला तरी त्याचे साैम्य लक्षणे आढळून येतात. उपचाराअंति रुग्ण बरे होण्यासही मदत होईल,
डाॅ. एन. बी. गोसावी,
सर्जन
किडनी विकार असलेले तसेच मधुमेह इतर जुनाट आजाराच्या रुग्णांनी उपचार सुरू असलेल्या डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार लस घ्यावी, लस घेतल्यानंतर प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. त्यामुळे भीती न बाळगता लस घेणे गरजेचे आहे.
डाॅ. विरेंद्र गवळी,
लेप्रोस्काॅपी सर्जन,