बाहेरगावातील मतदारांना मतदानासाठी विनवण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:25 IST2021-01-13T05:25:06+5:302021-01-13T05:25:06+5:30

लोहारा : तालुक्यात सध्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. त्यामुळेच या आधी कधीही विचारपूस न करणारे आता बाहेरगावी राहणाऱ्या ...

Encourage out-of-town voters to vote | बाहेरगावातील मतदारांना मतदानासाठी विनवण्या

बाहेरगावातील मतदारांना मतदानासाठी विनवण्या

लोहारा : तालुक्यात सध्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. त्यामुळेच या आधी कधीही विचारपूस न करणारे आता बाहेरगावी राहणाऱ्या गावातील मतदारांना दररोज फोन करून काका, काकू, मामा, मामी, भाऊ, ताई, नाना, अप्पा, दाजी, आजी या गावाकडे. निवडणूक सुरू आहे. मी स्वत: उभा राहिलोय, असं म्हणत विणवण्या करत असल्याचे चित्र आहे.

लोहारा तालुक्यातील कानेगाव, भातागळी, कास्ती (बु.), कास्ती (खुर्द), लोहारा (खुर्द), एकोंडी (लो), मुर्शदपूर, उदतपूर, चिंचोली काटे, मोघा, बेलवाडी, हराळी, कोंडजीगड, करवंजी, हिप्परगा सय्यद, फणेपूर, भोसगा, आष्टाकासार, होळी, दस्तापूर व करजगाव या २१ ग्रामपंचायतच्या निवडणुका होत आहेत. यासाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. तालुक्यात कोणत्या गावात दुरंगी तर कोणत्या गावात तिरंगी लढत होत आहे. गेल्या काही वर्षांपासून वाढलेल्या यांत्रिकीकरणामुळे ग्रामीण भागात कमी झालेल्या रोजगाराच्या संधी आणि इतर काही कारणांमुळे ग्रामीण भागातील अनेक मतदार रोजगारासाठी शहरी भागात स्थलांतरित झाले आहेत. या विस्थापित मतदारांना परत आणून त्यांचे मतदान मिळविण्यासाठी उमेदवार आता वेगवेगळ्या शक्कल लढवीत आहेत.

एका कुटुंबातील चार ते पाच मतदार असल्याने त्यांना ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी कसे आणावे? त्यांना आणण्यासाठी खर्चही अधिक येणार असल्याने काय करावे? असे प्रश्न इच्छुक उमेदवारांना पडले आहेत. वास्तविक गावस्तराचे राजकारण म्हटल्यावर एक-एक मताला किंमत आहे. त्यामुळे दिवसभर प्रचार करून रात्री मतदारयादी घेऊन आपल्याला किती मतदान पडते याची गोळाबेरीज केली जात असून, बाहेर गावी किती मतदार आहेत, ते कोणाच्या संपर्कातील आहेत, याचा शोध घेऊन त्यांच्याकडून त्याचा फोन नंबर घेऊन संपर्क साधला जात आहे व फोन करून काका, काकू, मामा, मामी, भाऊ, ताई, नाना, अप्पा, दाजी, आजी गावाकडे या बरं. निवडणूक सुरू आहे. मी स्वत: उभारलोय. येण्या- जाण्याचे गाडीभाडे मी देतो. त्याची काळजी करू नका, असे म्हणत विनवण्या करीत असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Encourage out-of-town voters to vote