कळंब : ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांपर्यंत सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे पाणी पोहोचले नाही, अशा कुटुंबांना जलजीवन मिशन अंतर्गत नळ जोडणी कार्यान्वित करण्याचा व्यापक कार्यक्रम हाती घेण्यात आला असून, तालुक्यातील ८६ ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील ११ हजार कुटुंब या नळ योजनेशी ‘कनेक्ट’ होणार आहेत.
प्रत्येक घराला अन् कुटुंबाला स्वच्छ आणि शुद्ध पिण्याचे पाणी मिळाले पाहिजे अन् ते स्थानिक स्वराज्य संस्थेने पुरवले पाहिजे, यासाठी आजवर राज्य व केंद्र शासनाने अर्थसाहाय्यीत केलेल्या जलस्वराज्य ते राष्ट्रीय पेयजल अशा अनेक योजना राबविण्यात आल्या. गावाची पाण्याची गरज भागवणे हाच या योजनेचा मुख्य उद्देश होता. अलिकडे अशा पाणी पुरवठा योजना राबवताना कायमस्वरूपी पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यावर भर देत उद्भव ते पाण्याची टाकी व टाकी ते घर असे पाणी पोहोचवण्याचा प्रयत्न झाला. यातील शेवटचा घटक असलेल्या नळधारक कुटुंबाचे सर्वेक्षण करून मध्यंतरी त्यांची माहिती संकलित करण्यात आली होती. यावेळी गावगोवी पाण्यासाठी मोठा खर्च झाला, तरी आजही असंख्य कुटुंबांपर्यंत सार्वजनिक पाणी पुरवठा योजनेचे पाणी पोहोचले नसल्याचे समोर आले होते. यानुसार केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन अंतर्गत महत्त्वाकांक्षी अशा ‘हर घर नल से जल’ या उपक्रमांतर्गत पाणी पोहोचवणे, यासाठी नळ देण्याचा कार्यक्रम नियोजित केला आहे.
मध्यंतरी केलेल्या सर्वेक्षणातून तालुक्यातील ९१ पैकी ८६ ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या गावातील तब्बल ११ हजार ४८१ कुटुंबांकडे नळ नसल्याने या योजनेंतर्गत त्यांना नळ कनेक्शन्स देण्यासाठी ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, पंचायत समिती व स्थानिक ग्रामपंचायती कामाला लागल्या आहेत. यामुळे उपरोक्त कुटुंबांना निश्चित स्वरूपाचा पाणी पुरवठा होणार आहे, असे ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचे अभियंता सावंत यांनी सांगितले.
चौकट...
पाणी येणार अंगणी
तालुक्यातील ९१ ग्रा. पं. पैकी बोरगाव (बु), बोरगाव (खु), लोहटा (पूर्व), देवधानोरा व सौंदना अंबा या गावातील स्थिती यासंदर्भात ‘निरंक’ असल्याने उर्वरित ८६ गावातील ११ हजार ४८१ कुटुंबांना जल जीवन मिशन अंतर्गत ‘कार्यात्मक घरगुती नळजोडणी’ देण्यात येणार आहे. यासाठीचा प्रकल्प तयार असून, तो लागलीच कार्यवाहीत येणार आहे. यामुळे ‘हर घर नल से जल’ हा कार्यक्रम राबवला जावून यातील साडेचार हजार कुटुंबांच्या अंगणात आता सार्वजनिक पाणी पुरवठा योजनेचे पाणी येणार आहे.
असे आहे स्वरूप
राष्ट्रीय पेयजल योजना या बहुचर्चित योजनेस आता जल जीवन मिशन नावाने ओळखले जात आहे. यात केंद्र व राज्य शासन समसमान खर्चाचा वाटा उचलत आहे. यात प्रत्येक कुटुंबाला मानसी ५५ लिटर प्रतिदिन स्वच्छ पिण्याचे पाणी देण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून प्रकल्प बनवले जात आहेत. पहिल्या टप्प्यात वंचित कुटुंब नळ योजनेशी ‘कनेक्ट’ केली जाणार आहेत. यानंतर दुसऱ्या टप्प्यात अस्तित्वातील पाणी पुरवठा योजनांची सुधारणात्मक अर्थात रेट्रोफिटींगची कामे करत क्षमतावृद्धी, बळकटीकरण करण्यावर भर दिला जाणार आहे. तिसऱ्या टप्प्यात अस्तित्वातील योजना, त्याचा उद्भव कमकुवत ठरत असेल तर पर्यायी योजना घेण्यावर भर दिला जाणार आहे. यासाठी प्रारंभी पंधराव्या वित्त आयोगाच्या प्राप्त झालेल्या ‘बंधित’ निधीचा विनियोग करावा. हा वियतव्यय कमी पडत असेल तर जल जीवन मिशन अंतर्गत निधी मिळणार आहे.
२१ गावांचे अंदाजपत्रक तयार
दरम्यान, जल जीवन मिशन अंतर्गत सध्या मिशन मोडवर काम करण्यात येत असून, बारातेवाडी, चोराखळी, दुधाळवाडी, कोथळा, कन्हेरवाडी, मंगरूळ, येरमाळा, जायफळ आदी २१ गावातील यासंबंधीचे अंदाजपत्रक प्रशासकीय व तांत्रिक मान्यतेच्या प्रक्रियेत आहेत.
‘टॉप फाईव्ह’ गावे
गाव संभावित नळ कनेक्शन
उपळाई ६६८
खामसवाडी ५५९
ईटकूर ५४५
सापनाई ५३८
कोथळा ४४८