विद्युतपंप चोरटे जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:35 IST2021-08-19T04:35:58+5:302021-08-19T04:35:58+5:30
उस्मानाबाद : शेतातील विहिरीवर लावलेल्या विद्युत पंपाच्या चोरीचा छडा लावण्यात कळंब तालुक्यातील शिराढोण पोलिसांना यश आले असून, रांजणी शिवारातून ...

विद्युतपंप चोरटे जेरबंद
उस्मानाबाद : शेतातील विहिरीवर लावलेल्या विद्युत पंपाच्या चोरीचा छडा लावण्यात कळंब तालुक्यातील शिराढोण पोलिसांना यश आले असून, रांजणी शिवारातून चोरीस गेलेल्या विद्युत पंपासह तिघांना अटक करण्यात आली आहे.
कळंब तालुक्यातील रांजणी येथील नरसिंग पानढवळे यांच्या शेतातील विहिरीवर असलेला ३ अश्वशक्ती क्षमतेचा विद्युत पंप १५ व १६ ऑगस्टच्या रात्री चोरीस गेला होता. ही बाब निदर्शनास आल्यानंतर शेतकरी पानढवळे यांच्या फिर्यादीवरून शिराढोण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
तपासादरम्यान शिराढोणचे सपोनि वैभव नेटके यांच्यासह पोउपनि गोडसे, तांबारे, पोना पठाण, कलशेट्टी, तोटावार, पोकॉ तारळकर, घोडके, लाकाळ यांनी गुन्ह्याच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करून व गोपनीय माहितीच्या आधारे ग्रामस्थ बालाजी मोतीराम सोनपारखे, नानासाहेब शहाजी सोनपारखे व धनाजी दादाराव सोनपारखे यांना १८ ऑगस्ट रोजी ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्याकडून चोरीस गेलेला विद्युत पंपही जप्त करण्यात आला.
दरम्यान, मागील दोन वर्षांपासून कोरोना संकट तसेच पावसाच्या लहरीपणामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. अशातच चोरट्यांकडून शेतातील विद्युत पंप, जनावरे व इतर शेतीउपयोगी साहित्याची चोरी होऊ लागल्याने शेतकऱ्यांत दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने इतरही चोऱ्यांचा छडा लावून चोरट्यांना जेरबंद करावे, अशी मागणी होत आहे.
चोरीच्या दुचाकीसह आरोपी ताब्यात
तालुक्यातील येडशी येथील विशाल शिंदे यांची दुचाकी (क्र. एम.एच. २४/ एच ५०८५) १५ ते १६ ऑगस्ट दरम्यानच्या रात्री त्यांच्या राहत्या घरासमोरुन अज्ञाताने चोरुन नेली होती. याप्रकरणी उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान येडशी येथील जुने रेल्वे स्थानक परिसरातील रहिवासी संभाजी शहाजी पवार ऊर्फ बालाजी (वय २९) हा संशयितरीत्या एक दुचाकी बाळगून असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळाली. यावरून पथकाने त्यास ताब्यात घेऊन दुचाकीबाबत खात्री केली असता ती वरील गुन्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले. यावरून चोरीच्या दुचाकीसह संभाजी पवार यास ताब्यात घेण्यात आले.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखालील पोना टेळे, पोकॉ ढगारे, मरलापल्ले, ठाकूर, आरसेवाड, माने यांच्या पथकाने केली. या आरोपीस उर्वरित कारवाईस्तव उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.