पुजारी, व्यापाऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:22 IST2021-06-20T04:22:18+5:302021-06-20T04:22:18+5:30
तुळजापूर : दुसऱ्या लाटेत कोरोनाचे संक्रमण वाढल्यानंतर महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या श्री तुळजाभवानी देवीचे मंदिर भाविकांसाठी ...

पुजारी, व्यापाऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले
तुळजापूर : दुसऱ्या लाटेत कोरोनाचे संक्रमण वाढल्यानंतर महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या श्री तुळजाभवानी देवीचे मंदिर भाविकांसाठी बंद करण्यात आले. यामुळे मंदिरावर अवलंबून असलेले जवळपास साडेसातशे छोटे-मोठे व्यापारी, व्यावसायिक व दोन-अडीच हजार पुजाऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णत: कोलमडले असून, मंदिर उघडून व्यवसाय करू द्या, अशी मागणी पुजारी, व्यापाऱ्यांमधून होत आहे.
मार्च-२०२० मध्ये कोरोनाचे संक्रमण वाढल्याने श्री तुळजाभवानी देवीचे मंदिर भाविकांसाठी बंद करण्यात आले होते. ते तब्बल आठ ते नऊ महिने बंद राहिले. यामुळे शहरातील जवळपास अडीच हजार पुजाऱ्यांसह हळद-कुंकू, फूल, हार, ओटी, नारळ, पेढा, खेळणी, मूर्ती विक्रेते, हॉटेल, लॉजमालक आदी व्यावसायिकांसह मंदिरावर अवलंबून असलेले जवळपास ७५० ते ८०० व्यावसायिकांचे आर्थिक गणित कोलमडले. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये कोरोनाचे संक्रमण कमी झाल्याने दिवाळी-पाडव्याच्या मुहूर्तावर प्रशासनाने नियम, अटी लादून भाविकांसाठी मंदिर खुले केले. यानंतर विस्कटलेली आर्थिक घडी बसत असतानाच कोरोनाची दुसरी लाट आल्याने पुन्हा एप्रिल २०२१ मध्ये प्रशासनाने शासनाच्या पुढील आदेशापर्यंत मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला. व्यापारी, व्यावसायिक, पुजारी पुन्हा आर्थिक संकटात सापडले.
दरम्यान, मागील आठवड्यात ज्या जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे, त्या ठिकाणी पाच टप्प्यांमध्ये सर्व व्यवसाय, व्यवहार वेळेची बंधने घालून व कोरोनाचे नियम लावून खुले केले आहेत. मात्र, भाविकांसाठी बंद असलेल्या मंदिराचा प्रश्न मात्र अनुत्तरित असल्याने त्यावर अवलंबून असलेल्या पुजारी, व्यापारी, व्यावसायिकांची अडचण कायम आहे.
कोट..........
आम्ही देवीच्या मूर्ती आणि पूजा साहित्याचे दुकान चालवून कुटुंबाची उपजीविका भागवितो; मात्र, कोरोनामुळे पहिल्या टप्प्यात ८ महिने मंदिर बंद होते. यामुळे व्यवसायही ठप्प झाल्याने कुटुंबाचे अतोनात हाल झाले. त्यानंतर काही दिवस मंदिर खुले केल्यामुळे व्यवसाय मूळ पदावर येत होता. परंतु, दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा भाविकांसाठी मंदिर बंद केल्याने व्यवसाय बंद झाला. यामुळे आर्थिक अडचणीत भर पडली आहे. शहरातील ८० टक्के नागरिक देवीच्या मंदिरावर अवलंबून आहेत. मंदिर उघडत नसल्याने आमच्यावर आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही, असे पत्रही मी मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे.
- संजय बोंदर, व्यापारी