कोरोना काळात स्वॅब संकलन ते स्टाफ नर्सची पार पाडली जबाबदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:30 IST2021-03-08T04:30:38+5:302021-03-08T04:30:38+5:30
कळंब : कोरोना वाॅर्डात दाखल झालेल्या त्या चार वर्षाच्या चिमुरडीला एका अधिपरिचारिकेने मायेचा आधार दिला. त्यांच्या सेवाभावामुळे उभयतांमध्ये ...

कोरोना काळात स्वॅब संकलन ते स्टाफ नर्सची पार पाडली जबाबदारी
कळंब : कोरोना वाॅर्डात दाखल झालेल्या त्या चार वर्षाच्या चिमुरडीला एका अधिपरिचारिकेने मायेचा आधार दिला. त्यांच्या सेवाभावामुळे उभयतांमध्ये ऋणानुबंध निर्माण झाला. लळा लागला, डिस्चार्ज होताना त्या चिमुरडीचे डोळे पाणावले. यावेळी त्या निरागस चिमुरडीच्या तोंडातून बाहेर पडले ते शब्द होते 'दीदी...’. कोरोनाच्या भयावह लाटेत धिराने काम करणाऱ्या कळंब येथील महादेवी गोरे या कर्तव्यदक्ष ‘सिस्टर’ हा अनुभव सांगतानाही गहिवरल्या होत्या.
कोरोनाचा प्रकोप गल्ली ते दिल्ली वाढला होता. याकाळी नुसतं कोरोनाचं नाव काढलं तरी घाम फुटत होता. या अपरिचित महामारीने सारं जग स्तब्ध केले होते. सर्व यंत्रणा हतबल झाल्या होत्या. मनुष्यजातीचं मनोबल खचलं होतं. या काळात आरोग्य यंत्रणेतील काही व्यक्ती मात्र 'देवदूत' म्हणून रुग्णसेवा करत होत्या. या कोरोना योध्द्यांपैकीच कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयात अधिपरिचारिका म्हणून कार्यरत असलेल्या महादेवी अशोक गोरे या एक आहेत. नर्सिंग आणि बेंगलोर येथे ‘मानसशास्त्रीय परिचारिका’ असे विशेष शिक्षण घेत अठरा वर्षांपूर्वी आरोग्य सेवेत दाखल झालेल्या गोरे यांच्यासाठी हा काळ ‘सत्त्वपरीक्षा’ घेणारा असाच होता. नव्या जागतिक महामारीच्या संकटात त्यांनी स्वॅब संकलन ते कोरोना वाॅर्डातील ‘स्टाफ नर्स’ अशी जोखीमभरी कामे पार पाडली. आजही त्या यात अव्याहत कार्यरत आहेत.
आपल्या सेवेप्रती आदरभाव, कर्तव्यनिष्ठा असलेल्या महादेवी यांनी प्रत्यक्ष कोरोना वाॅर्डात पीपीई कीट घालत रुग्णांवर उपचार तर केले, शिवाय ‘घाबरू नका’ हा महत्त्वाचा धीर देत अनेक रुग्णांना आधार दिला. स्वत:ची काळजी घेत रुग्णांच्या जवळ गेल्या, आस्थेनं चौकशी करत सेवा दिली. हा संसर्गजन्य आजार आहे, तो आपल्यापासून दुसऱ्यांना होऊ नये यासाठीच ‘डिस्टन्स’ ठेवला जातो, याची रुग्णांना जाणीव करून देत त्यांच्या मनातील दुरावा दूर केला. यातून त्यांना अनेक रुग्णांनी नावानिशी ओळख ठेवली आहे. ती चार वर्षाची चिमुरडी आजही गोरे यांना फोन करते व दीदी कशी आहेस, असे विचारते. यातूनच गोेरे यांच्या सेवाभावाची प्रचिती येते.
चौकट....
जिव्हाळा आनंद देणारा...
चार वर्षांच्या चिमुरडीनं बहीण मानलं. तसेच सुरुवातीस दाखल झालेल्या एका दांपत्याने तर अक्षरशः देवदुताची उपमा देत लोटांगण घेतलं. योग्य निर्णय घेत अवघ्या दहा मिनिटात स्वॅब ते रेफर असा निर्णय घेतल्यानं जीवदान मिळालेल्या त्या वयस्कांचं ‘नेमकं मला काय झालंय’ हे निरागसतेनं विचारणं अन् यावेळी मला माझ्या अश्रूंना आवरता न येणं, असे काही प्रसंग माझ्या कोरोना ड्युटी काळातील अविस्मरणीय असे आहेत.
मी धीर दिला, त्यांनी आधार दिला...
कोरोना काळात रुग्णांना धीर देणे गरजेचे असते. मी आमच्या स्टाफसह यावर भर दिला. अगदी रक्षाबंधनाचा ‘धागा’ ते दिवाळीचा ‘गोडवा’ याची उणीव कोरोना वाॅर्डात जाणवू दिली नाही. याच काळात या सेवायज्ञात सहभागी असलेल्या अनेक कर्मचाऱ्यांना समाजाचा आधार मिळत नव्हता. यावेळी मी कळंबच्या संभाजीनगरात एकट्या मुलासह राहत होते. यावेळी स्थानिकांनी मला, मुलाला मोठा आधार दिला. तिरस्कार तर दूर, उलट मी घरी नसल्यावर मुलाला डबा, दुधाचा आग्रह झाला. ‘काही अडचण आली, तर फोन करा’ म्हणून नंबर दिले गेले. यामुळे माझे मनोबल अधिकच वाढले.