काेराेनामुळे यंदा दहावी, बारावी परीक्षेसाठी शाळा तिथे केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:32 IST2021-04-07T04:32:49+5:302021-04-07T04:32:49+5:30
उस्मानाबाद -काेराेनाचा संसर्ग दिवसागणिक वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर यंदा ‘शाळा तिथे परीक्षा केंद्रा’चे नियाेजन करण्यात आले आहे. दाेन्ही ...

काेराेनामुळे यंदा दहावी, बारावी परीक्षेसाठी शाळा तिथे केंद्र
उस्मानाबाद -काेराेनाचा संसर्ग दिवसागणिक वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर यंदा ‘शाळा तिथे परीक्षा केंद्रा’चे नियाेजन करण्यात आले आहे. दाेन्ही वर्गाचे मिळून सुमारे ३६ हजार ६२७ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नाेंदणी केली आहे. परीक्षा ऑफलाइन हाेणार की ऑनलाइन, याचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे तुर्तास तरी शिक्षण विभागाकडून ऑफलाइन परीक्षेची तयारी करण्यात आली आहे.
काेराेनाचा संसर्ग झपाट्याने वाढू लागला आहे. प्रतिदिन दाेनशे ते अडीचशेच्या दरम्यान रुग्ण आढळून येत आहेत. अशीच परिस्थिती राज्यातील अन्य जिल्ह्यांतही आहे. दरम्यान, या संकटाचा परिणाम आता हाेऊ घातलेल्या दहावी, बारावीच्या परीक्षेवर झाला आहे. आजवर एका केंद्रांवर पाच ते सहा शाळांतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे नियाेजन केले जात हाेते; परंतु यंदा काेराेनामुळे या नियाेजनात माेठा बदल करण्यात आला आहे. परीक्षा ऑनलाइन की ऑफलाइन हाेणार, याबाबत कुठल्याच स्वरूपाचा ताेडगा निघालेला नाही. असे असले तरी तुर्तास शिक्षण विभागाने ऑफलाइन परीक्षेचे नियाेजन केले आहे. दहावी परीक्षेसाठी २२ हजार ६७५ विद्यार्थ्यांनी नाेंदणी केली आहे. या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यासाठी मूळ ८३ आणि ३११ उपकेंद्रांवर बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. पंधरापेक्षा कमी पट असलेल्या शाळांची संख्या ३७ एवढी आहे. दरम्यान, बारावी परीक्षेचेही नियाेजन ‘शिक्षण’कडून करण्यात आले आहे. १३ हजार ९५२ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नाव नाेंदणी केली आहे, तर जुन्या अभ्यासक्रमाचे ९४१ विद्यार्थी आहेत. या सर्व विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था १३० परीक्षा केंद्रांवर करण्यात आली आहे. यात ३९ मूळ तर ९१ उपकेंद्र आहेत. सदरील परीक्षा काॅपीमुक्त वातावरणात व्हावी, यासाठी शिक्षण विभागाकडून आवश्यक ती तयारी करण्यात आली आहे. बैठे, भरारी पथकांची संपूर्ण परीक्षा प्रक्रियेवर नजर असणार आहे.
चाैकट..
२२ परिरक्षक कार्यालये...
दहावी, बारावीच्या परीक्षेसाठी जवळपास २२ परिरक्षक कार्यालये निर्माण करण्यात आली आहेत. यात दहावीची १२ तर बारावीच्या दहा कार्यालयांचा समावेश आहे. या केंद्राच्या माध्यमातून परीक्षा सुरळीत व्हाव्यात, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
मूळ केंद्रांतून प्रश्नपत्रिकांचे वितरण
दहावी, बारावीच्या परीक्षेसाठी मूळ परीक्षा केंद्राचेही नियाेजन करण्यात आले आहे. या केंद्रातूनच उपकेंद्रातील परीक्षार्थींना प्रश्नपत्रिका पुरविल्या जाणार आहेत. हाही बदल पहिल्यांदाच करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
काेट...
शासनाच्या सूचनेनुसार तुर्तास ऑफलाइन परीक्षेचे नियाेजन करण्यात आले आहे. मूळ केंद्रांसह उपकेंद्रांचीही निर्मिती केली आहे. सध्या जिल्हाभरातील सेंटरवर ३६ हजार ६२७ विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे नियाेजन केले आहे. परीक्षा काॅपीमुक्त वातावरणात व्हाव्यात, यासाठी आवश्यक त्या उपाययाेजना केल्या आहेत.
-गजानन सुसर, शिक्षणाधिकारी, माध्यमिक.