तुळजापूरकडे जाणा-या भाविकांचा तलावात बुडून मृत्यू
By Admin | Updated: October 15, 2016 20:21 IST2016-10-15T20:21:46+5:302016-10-15T20:21:46+5:30
कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजापूरकडे पायी जात असताना अंघोळीसाठी तलावात उतरलेल्या दोघा भाविकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली.

तुळजापूरकडे जाणा-या भाविकांचा तलावात बुडून मृत्यू
तामलवाडी, दि. १५ - कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजापूरकडे पायी जात असताना अंघोळीसाठी तलावात उतरलेल्या दोघा भाविकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी तुळजापूर-सोलापूर महामार्गावरील सांगवी-माळुंब्रा साठवण तलावात घडली. यावेळी तिघांना सुखरूप पाण्याबाहेर काढण्यात ग्रामस्थ व पोलिसांना यश आले.
रविवारी श्री तुळजाभवानी मातेचा पौर्णिमा उत्सव साजरा होत असून, यानिमित्त विविध ठिकाणाहून लाखोंच्या संख्येने भाविक पायी तुळजापूरकडे दर्शनासाठी जात आहेत. गुरूवारात्री रात्रीपासूनच तुळजापूरकडे जाणारे सर्व रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेल्याचे चित्र आहे. शनिवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथून प्रदीप नागेश आलेकर, नागराज तिपण्णा जोडणकर, पप्पू विजयकुमार बंटी, राजू सुभाष शिरनूर व अन्य एकजण तुळजापूरच्या वाटेवर होते.
सकाळी सांगवी-माळुंब्रा साठवण तलावात हे पाचजण अंघोळीसाठी गेले होते. मात्र, त्यांना तलावातील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने काही वेळातच हे पाचहीजण बुडू लागले. यावेळी तेथे उपस्थित इतर काही भाविक व ग्रामस्थांनी यातील प्रदीप नागेश आलेकर, नागराज तिपण्णा जोडणकर व अन्य एकास पाण्याबाहेर काढले. मात्र, पप्पू विजयकुमार बंटी (वय २०) व राजू सुभाष शिरनूर (वय १९, रा. गुलबगा) या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तब्बल दीड तास प्रयत्न केल्यानंतर या दोघांचे मृतदेह पाण्यात मिळून आले. ही घटना घडल्यानंतर भाविकांनी मोठ्या प्रमाणात तलावावर गर्दी केली होती. घटनेची माहिती कळताच सपोनि मिर्झा बेग, गोरोबा गाढवे, तानाजी माने, संजय जट्टे, राजाभाऊ ठाकूर यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देवून प्रेत शोधण्यासाठी प्रयत्न केले. या घटनेची नोंद तामलवाडी पोलीस ठाण्यात झाली आहे.
बालाजी अमाईन्सच्या रुग्णवाहिकेची मदत
तलावात बुडालेल्या भाविकांच्या शोधकामी तामलवाडी पोलीस ठाण्यातील कर्मचारी श्रीराम मायंदे, आनंद ताटे, प्रवीण बोंदर, होमगार्ड शेषेराव मडोळे, सुरतगाव येथील तंटामुक्त समिती अध्यक्ष सुरेश गुंड, तानाजी शिंदे, सुनिल सुरवसे, इसबाबी पंढरपूर यांनी दीडस तास पाण्यात प्रेताचा शोध घेतला. दरम्यान, वाढत्या गर्दीमुळे सरकारी रुग्णवाहिका तलावापर्यंत येवू शकत नव्हती. त्यामुळे पाण्यात सापडलेले प्रेत शवविच्छेदनासाठी प्रश्न निर्माण झाला होता. याच वेळी बालाजी अमाईन्स कारखान्याची रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. त्या रुग्णवाहिकेत या दोन भाविकांचे शव विच्छेदनासाठी नेण्यात आले.
पाच वर्षांपूर्वीची पुनरावृत्ती
पाच वर्षापूर्वी याच तलावात तीन भाविकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. तशी घटना पुन्हा घडू नये म्हणून दरवर्षी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. यंदाही तलावावर बंदोबस्त लावण्यात आला असून, भाविकांच्या माहितीसाठी सूचना फलकही लावण्यात आले आहेत. असे असतानाही पुन्हा पाच वर्षांपूर्वीच्याच घटनेची पुनरावृत्ती घडली.