उस्मानाबाद : तरुणांनो राजकारणात जरूर या; पण येताना सेवाव्रती भाव ठेवून या. त्यापूर्वी भाई उद्धवराव पाटील यांचे जीवनकार्य, त्यांची तत्त्वे अभ्यासून घ्या. तरच आपल्याला भविष्य आहे, अन्यथा दोन वर्षांत फॉर्च्युनर घ्यायची म्हणून राजकारणात येणार असाल तर लगेच संपून जाल. व्यक्तिगत हिताचे राजकारण टिकत नाही, असे प्रतिपादन आ. रोहित पवार यांनी गुरुवारी येथे केले.
शेकाप नेते भाई उद्धवराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी उस्मानाबादेत आ. पवार यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर होते. आ. संजय शिंदे, आदित्य धनंजय पाटील यांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पवार म्हणाले, भाई आयुष्यभर शेतकरी, कष्टकऱ्यांसाठी लढले. त्यासाठी त्यांनी जी तत्त्वे अंगीकारली होती, त्यास कधीही तडा जाऊ दिला नाही. एखादा निर्णय सर्वसामान्यांच्या हिताच्या विरोधात जाणार असेल तर भाई बोलायचे, लढायचे. लातूरच्या एका अधिवेशनात त्यांनी फुलचंद गांधी यांनी सावकारकी सोडावी म्हणून जोरदार आग्रह धरला होता. विरोध दर्शविला होता. भाईंची विरोधाची पद्धत अन् पटवून देण्याची क्षमता पाहून फुलचंद गांधी यांनी तेथेच सावकारकी सोडण्याचा निर्णय जाहीर केला. अगदी याच पद्धतीने आताही अशा चळवळींची गरज आहे. त्यामुळे तरुणांनी बोलले पाहिजे, व्यक्त झाले पाहिजे. अर्णब गोस्वामींच्या चॅटमधून अनेक गंभीर बाबी समोर आल्या; पण त्यावर चर्चा केली जात नाही. शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्यावर चर्चा होत नाही. सामान्यांच्या हिताविरोधात एखादा निर्णय झाल्यास आपण बोलले पाहिजे. खरा राष्ट्रवाद हाच आहे; पण हल्ली पाकिस्तानविरोधात बोलले की राष्ट्रवाद, असे रुजविले जात आहे, जे चुकीचे आहे, असेही पवार म्हणाले. याच कार्यक्रमात कोरोना काळात उत्तम सेवा बजावणाऱ्या नागरिक, कर्मचाऱ्यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला.
भाईंची मांडणी शेतकरी हिताची -जिल्हाधिकारी
जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी अध्यक्षीय समारोपात भाई उद्धवराव पाटील यांच्या कार्याचे विविधांगी संदर्भ देत तरुणांनी शेतकऱ्यांसाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. आजच्या जगण्यातील पेच ओळखायला यायला हवे. तरुणांनी हे पेच समजून घेत त्याची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भाईंनी त्यांच्या काळातील असेच पेच, कष्ट ओळखून ते सोडविण्यासाठी आयुष्य वाहून घेतले. वैचारिक मांडणीला कृतिशीलतेची जोड देऊन शेतकरी कसा समृद्ध होईल, याचाच विचार केला. तोच विचार अन् तीच चळवळीची परंपरा आपण पुढे नेली पाहिजे, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.