पॉलिटेक्निकनंतर नोकरी मिळते का रे भाऊ ? ९७० जागांसाठी ११६२ अर्ज !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:35 IST2021-09-18T04:35:43+5:302021-09-18T04:35:43+5:30
उस्मानाबाद जिल्ह्यातून १६२० विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले होते. यातील ११६२ विद्यार्थ्यांनी अर्ज प्रक्रिया पूर्ण केली आहे. यात शासकीय तंत्रनिकेतनला प्रवेशासाठी ...

पॉलिटेक्निकनंतर नोकरी मिळते का रे भाऊ ? ९७० जागांसाठी ११६२ अर्ज !
उस्मानाबाद जिल्ह्यातून १६२० विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले होते. यातील ११६२ विद्यार्थ्यांनी अर्ज प्रक्रिया पूर्ण केली आहे. यात शासकीय तंत्रनिकेतनला प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा ओढा दिसून येत असून, शासकीय महाविद्यालयात दुप्पट अर्ज आले आहेत.
यंदाच्या वर्षी संगणक, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा ओढा आहे. भविष्यात मशीन लर्निंग, आर्टिफिशियल इंटेफिजन्स, मेकॅट्रॉनिक्स आदी क्षेत्रांत करिअर करण्याच्या दृष्टीने पॉलिटेक्निक अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी प्रवेश घेत आहेत.
संगणक, सिव्हिलकडे विद्यार्थ्यांचा ओढा
जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा ओढा हा संगणक व सिव्हिल अभ्यासक्रमाकडे जास्त आहे. त्याखालोखाल ऑटोमोबाईल्स अभ्यासक्रमाला पसंती दर्शवित आहेत, असे प्रवेश समिती प्रमुख एल. एम. माने यांनी सांगितले.
विद्यार्थी म्हणतात...
पॉलिटेक्निक केल्यानंतर शासकीय, तसेच निमशासकीय नोकरीच्या संधी आहेत. दोन्हीतही संधी मिळाली नाही तर स्वत:चा व्यवसाय टाकू शकतो. यातून नवनवीन शिकता येते. आपल्या क्षमतांना वाव मिळतो.
कैलास गायकवाड, विद्यार्थी
पॉलिटेक्निकनंतर नोकरी, व्यवसायाला संधी आहेत. शिवाय तंत्रशिक्षणात पदवी व पद्व्युत्तर अभ्यासक्रमही पूर्ण करून मिळालेल्या नोकरीत किंवा सुरू केलेल्या व्यवसायात प्रगती साधता येते. त्यामुळे पॉलिटेक्निकला प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला.
संकेत कांबळे, विद्यार्थी
प्राचार्य म्हणतात....
पॉलिटेक्निक केल्यानंतर विद्यार्थ्यांना शासकीय तसेच निमशासकीय सेवेत संधी आहेत. विद्यार्थी बेरोजगार राहत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा कल पॉलिटेक्निककडे वाढला आहे. यावर्षी शासकीय पॉलिटेक्निकसाठी ३७० प्रवेश क्षमता आहे. अर्ज ९६२ आले आहेत.
प्राचार्य डॉ. डी. एम. घायटिळक, शासकीय पॉलिटेक्निक, उस्मानाबाद
यंदा पॉलिटेक्निक प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा प्रतिसाद चांगला आहेत. इलेक्ट्रिक, सिव्हिलला जास्त पसंती मिळत आहे. सध्या ३०० विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. प्रवेश प्रक्रिया १५ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार असल्याने प्रवेश वाढू शकतात.
प्राचार्य अमरसिंह कवडे, एस. पी. पॉलिटेक्निक, उस्मानाबाद
जिल्ह्यातील प्रवेश क्षमता
४
पॉलिटेक्निक महाविद्यालये
९७०
प्रवेश क्षमता
११६२
प्रवेश अर्ज
पॉलिटेक्निक महाविद्यालये
शासकीय १
खासगी ३
महाविद्यालय प्रवेश क्षमता
शासकीय ३७०
खासगी ६००