दुभाजक झाले गायब, अपघाताचा धोका वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:30 IST2021-03-25T04:30:26+5:302021-03-25T04:30:26+5:30
शहरातील तेरणा महाविद्यालय ते शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय या दरम्यानच्या मुख्य रस्त्यांची दुरवस्था झाली होती. रस्त्यावर खड्डेच खड्डे पडलेले होते. ...

दुभाजक झाले गायब, अपघाताचा धोका वाढला
शहरातील तेरणा महाविद्यालय ते शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय या दरम्यानच्या मुख्य रस्त्यांची दुरवस्था झाली होती. रस्त्यावर खड्डेच खड्डे पडलेले होते. काही ठिकाणी रस्ता उखडल्याने वाऱ्यात धुळीचे लोट पसरत होते. त्यामुळे वाहनधारकांना वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागत होते. दरवर्षी रस्त्याची डागडुजी केली जात. पावसाळ्यात पुन्हा जैसे थे स्थिती होत. हा रस्ता नव्याने करण्यात यावा, अशी मागणी शहरवासियांसह प्रवाशांतून होत होती. त्यामुळे जानेवारी महिन्यापासून रस्त्याच्या कामास प्रारंभ झाला. रस्त्याची उंची वाढवून पक्का रस्ता करण्यासाठी अनेक ठिकाणचे दुभाजकही हटविण्यात आले हाेते. आता रस्ता पूर्ण होऊन एक ते दीड महिन्याचा कालावधी पूर्ण झाला आहे. मात्र, रस्ता करतावेळी काढण्यात आलेले दुभाजक अद्याप बसविण्यात आलेले नाहीत. रस्त्यावर दुभाजक नसल्याने अनेक वाहनधारक मनमानी पद्धतीने वाहने चालवित आहेत. शिवाय, अवजड वाहने काढण्यात आलेल्या दुभाजकाच्या ठिकाणातून रस्ता क्रॉस करीत आहेत. त्यामुळे नियमांचे पालन करुन वाहने चालविणाऱ्या वाहनचालकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय, अनेक वाहनचालक मनात येईल अन् वाट दिसेल, तिथून बेभापणे सर्रास दुसऱ्या बाजूला जातात. त्यामुळे लहान-मोठे अपघात घडण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे या ठिकाणी दुभाजक बसविण्यात यावे, अशी मागणी शहरवासियांतून होत आहे.
प्रतिक्रिया...
शहरात नव्याने तयार करण्यात आलेल्या रस्त्यांच्या उंचीमुळे दुभाजकांची उंचीही आता अवघ्या एक ते दीड फुटावर येऊन ठेपली आहे. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी आता ठराविक वळण घेणे रिक्षाचालक तसेच दुचाकीस्वार टाळत आहेत. त्याचबरोबर पादचारीही शॉर्टकटचा वापर करुन रस्ता ओलांडत आहेत.
त्यामुळे वाहन चालविणे जिकरीचे होत आहे.
आकाश सुरवसे, वाहन चालक
तेरणा महाविद्यालय ते भानू नगर परिसरातील रस्त्याचे नुकतेच काम झालेले आहे. या रस्त्याची उंची वाढविण्यात आली असल्याने दुभाजकाची उंची २ इंचही राहिली नाही. त्यामुळे भरधाव वाहनधारक रस्ता ओलांडत आहेत. परिणामी, दुचाकीस्वारांनाही जीव मुठीत धरुन रस्त्याने चालावे लागत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने दुभाजकाचे उंची वाढविणे गरजेचे आहे.
अमोल कांबळे, नागरिक