गरज संपताच नोकरीवरून काढले, नोकरीत कायम करण्याची होतेय मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:22 IST2021-06-28T04:22:33+5:302021-06-28T04:22:33+5:30
उस्मानाबाद : कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने जिल्ह्यात कोविड केअर सेंटरची संख्या वाढविण्यात आली होती. रुग्णांची गैरसोय होऊ नये, ...

गरज संपताच नोकरीवरून काढले, नोकरीत कायम करण्याची होतेय मागणी
उस्मानाबाद : कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने जिल्ह्यात कोविड केअर सेंटरची संख्या वाढविण्यात आली होती. रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली होती. मात्र रुग्णसंख्या कमी होताच अचानक ३० कोविड केअर सेंटर बंद केले आहेत. या केंद्रावरील ३०० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले आहे. परिणामी हे कर्मचारी बेरोजगारीच्या कचाट्यात सापडले असून, आम्हाला न्याय मिळावा, अशी मागणी कोविड कर्मचाऱ्यांतून होत आहे.
जिल्ह्यात जुलै महिन्यापासून कोरोना बाधितांची संख्या वाढत होती. या कालावधीत रुग्णांवर उपचार करता यावेत, यासाठी जिल्ह्यात ५८ कोविड केअर सेंटर कार्यान्वित केले होते. ऑक्टोबर महिन्यापासून रुग्ण कमी झाल्याने हे केंद्र कमी करण्यात येत होते. केवळ ८ ते १० कोविड केअर सेंटर सुरू ठेवण्यात आले होते. त्यामुळे या सेंटरवर काम करणारे कर्मचारी कार्यमुक्त केले होते. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोरोनाची दुसरी लाट धडकली. रुग्णांची संख्या वाढू लागल्याने ४५ कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले. या सेंटरवर डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय, लॅब टेक्निशियन असे एकूण ६९९ कर्मचारी नियुक्त करण्यात आले. जीव धोक्यात घालून या कर्मचाऱ्यांनी सेवा बजाविली. जून महिन्यात रुग्ण कमी झाल्याने ३० कोविड केअर सेंटर बंद करण्यात आले आहेत. या सेंटरवरील ३०० कर्मचाऱ्यांवर पुन्हा बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. कर्मचाऱ्यांना कायमस्वरमपी नोकरीत सामावून घ्यावे, अशी मागणी कोविड कर्मचाऱ्यांतून होत आहे.
कोविड कर्मचाऱ्यांना प्राधान्य मिळेल
कोविड केअर सेंटरवरील कर्मचाऱ्यांना तीन महिन्याच्या कालावधीसाठी नियुक्ती देण्यात आली होती. रुग्णांची संख्या कमी झाल्याने ३० कोविड केअर सेंटर बंद झाले आहेत. या ठिकाणी कार्यरत असलेले कर्मचारी कार्यमुक्त करण्यात आले आहेत. येत्या काळात रुग्ण वाढल्यानंतर कोविड कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल. कोविड कर्मचाऱ्यांना भत्ता लागू नसल्याने त्यांना सेवा बजावलेल्या कालावधीतील मानधन दिले जाणार आहे.
डॉ. धनंजय पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक
गरज सरो, वैद्य मरो
नॉन कोविडमधून कोविडमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विविध प्रकारचे भत्ते दिले जात आहेत. मात्र, कोविडमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना भत्ता मिळालेला नाही. शासनाने कोविड कर्मचाऱ्यांना भत्ता लागू करावा.
अजित कसबे, कंत्राटी कर्मचारी
कोरोना काळात जीव धोक्यात घालून सेवा बजाविली. आता रुग्ण कमी होऊ लागल्याने सेंटर बंद झाल्याने कामावरून कमी केले जात आहे. शासनाने कोविड कर्मचाऱ्यांचा विचार करून ११ महिन्यांची नियुक्ती देण्यात यावी.
अक्षय पलंगे, कोविड कर्मचारी
रुग्ण वाढले की आम्हाला ड्युटीवर बोलावले जाते. रुग्ण कमी झाल्यानंतर कोणताही विचार न करता कामावरून कमी करण्यात येते. या काळात अनेक कर्मचारी पॉझिटिव्ह आले आहेत. २३ जून रोजी कार्यमुक्तीचे पत्र दिले आहे. शासनाने कोविड कर्मचाऱ्यांना कामावर कायमस्वरूपी नोकरीत सामावून घ्यावे.
कविता गायकवाड, कोविड कर्मचारी