विधान परिषद बरखास्त करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:30 IST2021-05-24T04:30:50+5:302021-05-24T04:30:50+5:30
उस्मानाबाद : दिवसेंदिवस राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट होत चालली असून, राज्याला आत्मनिर्भर आणि स्वयंपूर्ण होण्यासाठी तसेच राज्यावरील कर्जाचा डोंगर ...

विधान परिषद बरखास्त करा
उस्मानाबाद : दिवसेंदिवस राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट होत चालली असून, राज्याला आत्मनिर्भर आणि स्वयंपूर्ण होण्यासाठी तसेच राज्यावरील कर्जाचा डोंगर वाढत असताना खर्च कमी करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र विधान परिषद बरखास्त करण्याबाबतचा ठराव विधानसभेत घेऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवावा, अशी मागणी जनता दलाचे प्रदेश कार्याध्यक्ष ॲड. रेवण भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
देशाच्या राज्यघटनेप्रमाणे केंद्रात संसद तयार करताना लोकसभा व राज्यसभा तयार करण्यात आली. त्याच धर्तीवर निवडून आलेल्या विधानसभेच्या सदस्यांच्या प्रमाणात विधान परिषद तयार केली गेली, विधान परिषदेवर कोट्यवधी रुपये खर्च होतात. ते पैसे वाचवून जनतेच्या कोणत्याही कामासाठी वापरले तरी चालतील. विधान परिषदेवरील सदस्यासाठी होणारा कोट्यवधी रुपयांचा खर्च म्हणजे इथल्या सामान्य माणसाच्या डोक्यावर लादलेले ओझेच आहे. विधान परिषद असलीच पाहिजे असे घटनेत कुठेही नमूद नाही. त्यामुळे महाराष्ट्र विधान परिषद बरखास्त करून जनतेच्या पैशावर पांढरा हत्ती पोसणे बंद करण्याचे आवाहनही ॲड. भोसले यांनी केले आहे.
खर्चही वाचेल...
महाराष्ट्र विधानसभेचे २८८ आमदार असल्याने विधान परिषदेसाठी ७८ आमदार निवडले जातात. परंतु, दक्षिणेतल्या काही राज्यांनी आपल्या विधान परिषदा रद्द करून त्यावरील खर्च वाचविला आहे. त्यानुसार राज्याचाही खर्च वाचविण्यासाठी विधान परिषद बरखास्त करावी, असे ॲड. भोसले यांनी म्हटले आहे.