उमरगा :
तालुक्यातील डिग्गी गावातील ग्रामस्थांनी दोन वर्षांपूर्वी जवळपास दोन एकरांमध्ये वृक्षारोपण करून त्याचे संगोपन केले. सर्व झाडांची योग्य पद्धतीने निगा राखल्याने संबंधित माळरानावर वनराई बहरली आहे. बुधवारी डिग्गीच्या माळरानावर माजी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. विठ्ठलराव जाधव व माजी आरोग्य उपसंचालक डॉ. मुकुंद डिग्गीकर यांच्या हस्ते वृक्षारोपण व बीजारोपण करण्यात आले.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भावाचे नवीन संकट सर्वांसमोर आले. पहिल्यांदाच रुग्णांना ऑक्सिजनची इतक्या मोठ्या प्रमाणात आवश्यकता भासली. वृक्षलागवड तसेच निसर्गाचा समतोल अत्यावश्यक असल्याचे पहिल्यांदाच सर्वांसमोर आले. अनेक ठिकाणी शासनाच्या वतीने लाखो रुपये खर्च करून वृक्ष संवर्धन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या कार्यासाठी अनेक सामाजिक संस्था, राजकीय पक्ष व संघटना स्वतःहून पुढाकार घेत आहेत. असाच एक प्रयत्न डिग्गी गावातील ग्रामस्थांनी दोन वर्षापूर्वी केला व दोन एकरांमध्ये वृक्षारोपण करून त्याचे संगोपन केले. सर्व झाडांची योग्य पद्धतीने निगा राखल्याने चक्क माळरानावर वनराई बहरली आहे. मोठ्या प्रमाणात झालेले हे वृक्षारोपण पाहण्यासाठी अनेक मान्यवरांनी यापूर्वीही भेटी दिल्या आहेत. शांतिदूत परिवार व रोटरी क्लबच्या वतीने सध्या वृक्षारोपण व सीड्स बॉलचे रोपण केले जात आहे.
चाैकट...
राज्याचे माजी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. विठ्ठलराव जाधव व माजी आरोग्य उपसंचालक मुकुंदराव डिग्गीकर यांनी सदरील ठिकाणास भेट दिली. यानंतर माळरानावर रोटरीच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सीडबॉलचे बीज रोपण करण्यात आले. याप्रसंगी वृक्षसंवर्धन समितीचे समन्वयक प्रा. युसूफ मुल्ला, प्रा. जयवंत डिग्गीकर, प्रा. राहुल डिग्गीकर, सरपंच संतोष कवठे, युवराज गायकवाड, बाजार समितीचे माजी उपसभापती सिद्धाराम हत्तरगे, दिनकर गायकवाड, राजू कुलकर्णी, सुधीर शिंदे, प्रशांत डिग्गीकर, रियाज पठाण आदी उपस्थित हाेते.