मोफत धान्य मिळाले का भाऊ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:21 IST2021-06-23T04:21:59+5:302021-06-23T04:21:59+5:30
कळंब : लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर कोणाची उपासमार होऊ नये यासाठी मे व जून महिन्यात प्रतिमाणसी पाच किलो याप्रमाणे धान्याचे वितरण ...

मोफत धान्य मिळाले का भाऊ?
कळंब : लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर कोणाची उपासमार होऊ नये यासाठी मे व जून महिन्यात प्रतिमाणसी पाच किलो याप्रमाणे धान्याचे वितरण करून ‘गरीब कल्याण’ करण्यात आले आहे. यास्थितीत दोन वेगवेगळ्या योजना असल्याने प्रत्येकजण एक दुसऱ्याला ‘मोफत धान्य मिळाले का भाऊ’, असा सवाल करत आहे.
कोरोनाच्या संसर्गाने दुसऱ्या लाटेच्या स्वरूपात मार्च महिन्यात पुन्हा ‘कमबॅक’ केले. यामुळे परत एकदा जनजीवन विस्कळीत झाले. अनेकांचा रोजगार हिरवणारे ‘लॉकडाऊन’ करण्याची वेळ शासनावर आली. विविध निर्बंध लादले जाऊन त्याचा कडक अंमल झाला. पहिल्या लाटेत कोलमडून पडलेले अनेक कुटुंब पुन्हा अडचणीत सापडले. यातही चाकरमानी, मध्यमवर्गीय, कष्टकरी, असंघटित कामगार यांच्यासमोर जगण्याचे प्रश्न निर्माण झाले. यास्थितीत कोणाची उपासमार होऊ नये यासाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब यादीतील शिधापत्रिकाधारकांना मे व जून महिन्यात मोफत धान्याचा आधार देण्याचा निर्णय घेतला.
याशिवाय शिधापत्रिकाधारकांना दरमहा दिल्या जाणाऱ्या नियमित परिणामाइतपत मालाची रक्कम एप्रिल किंवा मे महिन्याच्या मर्यादेत स्वतः भरणा करण्याचा निर्णय घेतल्याने हा मालही लाभार्थींसाठी मोफतच ठरला आहे. यास्थितीत मागच्या दीड महिन्यात कळंब तालुक्यात अनेक लाभार्थींना केंद्र व राज्य शासनाच्या योजनेतून धान्याचा आधार भेटला असला तरी लाभार्थी मात्र तुम्हाला नेमका किती माल मिळाला, मोफत माल मिळाला का, याची एकमेकांना विचारणा करत खातरजमा करत आहेत.
मालाचे परिमाण अन् चौकशा
मे महिन्यात अंत्योदय लाभार्थींना प्रतिशिधापत्रिका २३ किलो गहू व १२ किलो तांदूळ असे ३५ किलो, तर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतून प्रतिमाणसी तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ असे पाच किलो धान्य मोफत देणे आवश्यक होते. याशिवाय प्राधान्य कुटुंब यादीतील लाभार्थींना मे महिन्यात नियमित व गरीब कल्याण योजनेतून प्रतियोजना तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ असे प्रतिमाणसी धान्य मोफत देणे गरजेचे होते. जून महिन्यात अंत्योदय व प्राधान्यला गरीब कल्याण योजनेचे वरीलप्रमाणे पाच किलो मोफत धान्य देय आहे. शिवाय निर्धारित दरामध्ये नियमितचे अंत्योदयचे प्रतिकार्ड ३५, तर प्राधान्यला प्रतिमाणसी पाच किलो धान्य परिणाम आहे. हे परिमाण सहज लक्षात येत नसल्याने लाभार्थी एकमेकांना चौकशी करत आहेत.
मे क्लिअर, जून प्रोग्रेसमध्ये
कळंब तालुक्यात एकूण ३४ हजार शिधापत्रिकाधारक असून, त्यामध्ये एक लाख ६० हजार सदस्यांची संख्या आहे. यासाठी मे व जून महिन्यात मोफत वाटप करण्यासाठी तब्बल नऊ हजार ६०५ क्विंटल गहू, तर सहा हजार ४०३ क्विंटल तांदूळ लागणार होता. यापैकी मे महिन्याचे वाटप पूर्ण झाले आहे. जून महिन्यातील १४१ पैकी ८० स्वस्त धान्य दुकानदार यांना कोटा वितरित केला आहे. त्यांचे वाटप प्रगतिपथावर आहे. उर्वरित धान्य जात आहे.
चौकट...
धान्य घ्या, अंगठा लावा अन् स्लिप पडताळून पहा...
स्वस्त धान्यातील काळाबाजार रोखण्यासाठी ‘पॉस’ मशीनचा वापर करण्यात येतो. यात आधार लिंकड् सिस्टीमवर दिलेला माल, परिमान, निर्धारित दर याची नोंद होते. दिल्या, घेतल्याची नोंद होते. त्याची पावती मिळते. मध्यंतरी कोरोनाच्या नावाखाली यासाठीचा ‘अंगठा’ वर्ज्य ठरवत दुकानदारांना ‘नॉमिनी’ केले होते. आता परत ‘अंगठा’ बंधनकारक झाला आहे. यामुळे घेतलेला माल, नोंदलेला माल, पावती याची पडताळणी करणे तसेच धान्य घेतल्यानंतरच अंगठा करणे गरजेचे आहे.
प्रतिक्रिया
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत मे व जून महिन्यात प्रतिमाणसी तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ याप्रमाणे धान्य देय आहे. याचे मे महिन्यातील वाटप पूर्ण आहे. जून प्रगतिपथावर आहे. मोजक्या दुकानदारांचे धान्य पोहोचणे बाकी आहे. लाभार्थींनी धान्य, पावती याची खातरजमा करावी. काही अडचण असल्यास तहसील कार्यालयाशी संपर्क करावा.
- रोहन शिंदे, तहसीलदार, कळंब
माझ्या कुटुंबात सहा सदस्य आहेत. मला मे महिन्यातील मोफत धान्य मिळाले आहे. परंतु, दोन वेगवेगळ्या योजनांचे नेमके किती धान्य मोफत आहे याविषयी स्पष्ट माहिती नाही. जून महिन्याचे धान्य लवकरच घेणार आहे. अद्याप घेतलेले नाही.
- सर्जेराव आडसूळ
पॉइंटर्स
एकूण रेशन कार्डधारक - ३४,०७५
अंत्योदय - ५४१७
प्राधान्य कुटुंब - २८,६५८