अध्यक्षपदी अखेर धीरज पाटील
By Admin | Updated: September 22, 2014 00:54 IST2014-09-22T00:51:23+5:302014-09-22T00:54:22+5:30
बाबूराव चव्हाण , उस्मानाबाद जिल्हा परिषदेमध्ये याहीवेळी काँग्रेसने अखेर शिवसेना-भाजपसोबत हातमिळवणी केलीेधीरज पाटील यांची अध्यक्षपदी वर्णी लागली.

अध्यक्षपदी अखेर धीरज पाटील
बाबूराव चव्हाण , उस्मानाबाद
जिल्हा परिषदेमध्ये याहीवेळी काँग्रेसने अखेर शिवसेना-भाजपसोबत हातमिळवणी केलीे. रविवारी झालेल्या निवडणुकीत सेना-भाजपाच्या पाठिंब्यावर काँग्रेसचे धीरज पाटील यांची अध्यक्षपदी वर्णी लागली. उपाध्यक्षपदी सुधाकर गुंड यांची निवड झाली. निवडीची घोषणा होताच कार्यकर्ते, समर्थकांनी घोषणाबाजी करीत गुलालाची उधळण केली. दुसरीकडे काँग्रेसचे प्रशांत चेडे यांना ऐनवेळी उमेदवारी मागे घेण्यास भाग पाडल्याने त्यांच्या समर्थकांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींविरोधात संताप व्यक्त केला.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडी पुढे ढकलण्यासाठी काँग्रेसकडून हायकोर्टात धाव घेण्यात आली. मात्र हायकोर्टाकडूनही दिलासा मिळाला नाही. त्यामुळे २१ सप्टेंबर रोजी निवड प्रक्रिया पार पडली. मागील चार-पाच दिवसांपासून काँग्रेसकडून सदस्यांच्या बैठका घेऊन उमेदवारीबाबत एकमत करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. अखेर शनिवारी रात्री मुरूम येथे गढीवर झालेल्या बैठकीत शिवसेना-भाजप आणि काँग्रेस यांच्यात एक विचार झाला. त्यानंतर अध्यक्षपदासाठी प्रशांत चेडे आणि उपाध्यक्षपदासाठी सुधाकर गुंड यांच्या नावावर एकमत झाले. मात्र काँग्रेसच्याच एक गटात यावरुन नाराजीचा सूर होता. तरीही ठरल्याप्रमाणे निवडणूक पार पडेल, अशी अपेक्षा काँग्रेसच्या एका गटाच्या श्रेष्टीला होती. मात्र, सभागृहात आल्यानंतर भलतेच घडले. सर्व पक्षाचे सदस्य जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात जमल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करायला सुरुवात झाली. ठरल्याप्रमाणे काँग्रेसकडून अध्यक्षपदासाठी प्रशांत चेडे तर उपाध्यक्षपदासाठी सुधाकर गुंड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही महेंद्र धुरगुडे व मधुकर मोटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
दरम्यान, पालकमंत्र्यांच्या मतदारसंघातील काँग्रेस सदस्य धीरज पाटील यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केल्याने काँग्रेसमध्ये खळबळ उडाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने आणि अन्य काही सदस्यांना सोबत घेवून धीरज पाटील यांनी अध्यक्षपदी बाजी मारली तर उपाध्यक्षपद राष्ट्रवादीला जावू शकते. याची जाणीव होता होताच काँग्रेसकडून धीरज पाटील यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न सुरू झाला. मात्र धीरज पाटील स्वत:च्या निर्णयावरून तसुभरही ढळले नाहीत. डॉ. सुभाष व्हट्टे, संजय पाटील दूधगावकर आणि शिवसेनेच्या सदस्यांनीही धीरज पाटील यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनाही अपयश आले. त्यानंतर धीरज पाटील चक्क राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य बसलेल्या लाईनमधील डेस्कवर जाऊन बसले. त्यानंतर मात्र काँग्रेस, शिवसेना, भाजपा सदस्यांच्या पायाखालची वाळू सरकली. धीरज पाटील उमेदवारी मागे घेत नसल्याचे लक्षात आल्यानंतर हतबल झालेल्या काँग्रेस, सेना सदस्यांनी आपला मोर्चा प्रशांत चेडे यांच्याकडे वळविला. प्रशांत चेडे यांनी उमेदवारी मागे घ्यावी, असा आग्रह अध्यक्षांसह इतर सदस्यांनीही धरला. मात्र, बराच काळ प्रशांत चेडेही उमेदवारी मागे घेण्यास तयार नव्हते. त्यामुळे काँग्रेस-सेना सदस्यांची घालमेल वाढली होती. दूसरीकडे उमेदवारी मागे घेण्याची वेळ ही संपत चालली होती.
जिल्हाधिकारी तथा पीठासीन अधिकारी प्रशांत नारनवरे यांनी उमेदवारी मागे घेण्यास अवघे पाच मिनिटे शिल्लक असल्याचे सांगितल्यानंतर उपस्थित सदस्यांना काय करावे ते सूचत नव्हते. अखेर वरिष्ठांशी बोलल्यानंतर प्रशांत चेडे यांनी त्यांच्या स्वप्नांना मुरड घालत आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. आणि काँग्रेस-सेना सदस्यांचा जीव भांड्यात पडला. चेडे यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतल्यानंतर धुरगुडे यांनीही आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडीसाठी काँग्रेसकडून धीरज पाटील तर राष्ट्रवादीकडून मधुकर मोटे या दोघांमध्ये सरळ लढत झाली. यामध्ये पाटील यांना काँग्रेस, शिवसेना, भाजप यांची मिळून ३५ मते पडली. तर राष्ट्रवादीच्या मोटे यांना १९ मते मिळाली. त्यामुळे पीठासीन अधिकारी नारनवरे यांनी धीरज पाटील यांची जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी अधिकृत निवड जाहीर केली. उपाध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून सुधाकर गुंड तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अर्चनाताई पाटील, नानासाहेब जाधवर, महेंद्र धुरगुडे आणि सरस्वती पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यापैकी निवडणूक रिंगणात काँग्रेसचे सुधाकर गुंड तर राष्ट्रवादीच्या सरस्वती पाटील यांचा अर्ज राहिला. या दोन्ही उमेदवारात सरळ लढत झाली. सुधाकर गुंड यांना ३५ मते मिळाली तर सरस्वती पाटील यांना १९ मते पडली. त्यामुळे उपाध्यक्षपदी सुधाकर गुंड यांची निवड जाहीर करण्यात आली. यावेळी पिठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रूपाली सातपुते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बनसोडे आदी उपस्थित होते.