- संतोष वीर
भूम (धाराशिव ): तालुक्यातील रामेश्वर व चिंचोली परिसरातील मुसळधार पावसाने सोमवारी रात्री उशिरा भीषण दुर्घटना घडवली. वाहत्या पाण्याचा प्रवाह वस्तीवर धडकला आणि यामध्ये वस्तीवरील पत्र्याच्या शेडमध्ये राहणाऱ्या देवनाबाई नवनाथ वारे (वय अंदाजे 55) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास रामेश्वर व चिंचोली गावातून येणारे पावसाचे पाणी नगर-भूम रस्त्यावरील वड्यातून प्रचंड वेगाने वाहू लागले. पावसाचा जोर वाढल्याने पाणी शेती आणि वस्त्यांमध्ये शिरले. या दरम्यान, नगर रस्त्यालगत राहणाऱ्या देवनाबाई वारे यांच्या शेडमध्ये अचानक पाण्याचा प्रचंड लोंढा घुसला. झोपेत असलेल्या देवनाबाई यांना सावरण्याची संधी न मिळता त्या पाण्यात वाहून गेल्या.
घटनेनंतर ग्रामस्थांनी तातडीने मदतकार्य सुरू केले; परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. तहसीलदार व पोलिस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पुढील कार्यवाही सुरू आहे. मुसळधार पावसामुळे परिसरातील शेती व झोपड्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर पाणी शिरले आहे.
या दुर्घटनेमुळे चिंचोली गावात शोककळा पसरली असून देवनाबाई यांच्या निधनाने ग्रामस्थांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. “कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत मिळावी,” अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. पावसाळ्यात सुरक्षेसाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी होत आहे.