धाराशिव/तामलवाडी : मुंबई येथील ड्रग्ज पेडलर महिलेस बेड्या ठाेकल्यानंतर तस्करांच्या अटकसत्रास गती आली असून बुधवारी तुळजापूर येथून आणखी एकास जेरबंद केले. त्यामुळे आता अटकेतील आराेपींची संख्या १० एवढी झाली आहे. संशयित आणखी दाेघांच्या मागावर पाेलिसांची पथके आहेत.
एमडी ड्रग्ज पेडलर संगीता गाेळे या महिलेस वाढीव पाेलीस काेठडी मिळाल्यानंतर तस्करांची शाेधमाेहीम अधिक गतिमान झाली आहे. मंगळवारी पहाटे तुळजापूर शहरातील ऋतुराज गाडे, सुमित शिंदे, सयाजी शिंदे या तिघांना बेड्या ठाेकल्यानंतर सकाळी तामलवाडी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले. त्यांच्याकडून १० ग्रॅम ड्रग्जच्या १७ पुड्या जप्त करण्यात आल्या. यांना चाैदा दिवसांची पाेलीस काेठडी सुनावण्यात आली.
दरम्यान, गाेपनीय माहितीच्या आधारे बुधवारी सकाळी तुळजापूर शहरातून संकेत आनिल शिंदे या तरूणास अटक करण्यात आली. त्यामुळे आता १२ पैकी दहा ड्रग्ज तस्करांना अटक करण्यात पाेलिसांना यश आले आहे. आणखी दाेघेजण फरार असून पाेलिसांची पथके त्यांच्या मागावर आहेत. अधिक तपास सपाेनि गाेकूळ ठाकूर हे करीत आहेत.