नळदुर्ग (जि. धाराशिव) : सोमवारी दिवसभरात बँकेत जमा झालेली रक्कम रात्री सोलापूर येथील मुख्य शाखेत जमा करण्यासाठी दुचाकीवरून घेऊन जाणाऱ्या शाखाधिकाऱ्याने स्वतःच स्वत:वर धारधार शस्त्राने वार करीत लूटमार झाल्याचा कांगावा करून २५ लाख रुपये हडप करण्याच्या प्रयत्न केल्याचा प्रकार येथे घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील लोकमंगल मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडच्या शाखेतील शाखा व्यवस्थापक कैलास मारुती घाटे (वय ३२, रा. नळदुर्ग) हे सोमवारी दिवसभरात शाखेत जमा झालेली रक्कम घेऊन दुचाकीवरून सोलापूर येथील मुख्य शाखेत जमा करण्यासाठी जात होते. यावेळी पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी तरुणांनी प्रारंभी कैलास घाटे यांच्या तोंडावर मिरची पूड फेकली. यावेळी डोळ्यांत मिरची पूड गेल्याने घाटे यांनी दुचाकी बाजूला घेतली असता या दोघांनी बॅग घेण्यासाठी झटापट केली. यावेळी घाटे हे प्रतिकार करीत असताना त्या युवकांनी त्यांच्यावर धारधार शस्त्राने वार करून बॅग घेऊन पोबारा केला, अशी तक्रार घाटे यांनी नळदुर्ग ठाण्यात दिली होती. मात्र, याबाबत पोलिसांनी खोलवर जाऊन तपास केला असता २५ लाख रुपये हडपण्याच्या उद्देशाने घाटे यानेच हा बनाव केल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी या गुन्ह्यातील रकमेसह घाटे यास ताब्यात घेतले असून, याप्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
चोवीस तासांत लावला छडा२५ लाख रुपये तेही राष्ट्रीय महामार्गावर लुटल्याची तक्रार पोलिसांची झोप उडवून देणारी ठरली. त्यामुळे पोलिस प्रशासनाने तपासाची चक्रे गतीने फिरवत अवघ्या चोवीस तासांत गुन्हेगारासह तब्बल पंचवीस लाख रुपये हस्तगत केले.
जखमीवर नळदुर्ग रुग्णालयात उपचारया घटनेतील आरोपी कैलास घाटे हा जखमी असून, त्याच्यावर येथील जिल्हा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिस अधीक्षक रितू खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण, पोलिस निरीक्षक सचिन यादव, उपविभागीय पोलिस अधिकारी आदींनी घटनास्थळी भेट देत तपास करीत हा गुन्हा उघडकीस आणला.