Dharashiv: कावळ्यांनंतर आता कोंबड्यांनाही ‘बर्ड फ्ल्यू’; ढोकीत साडेआठशेंवर कोंबड्या नष्ट
By बाबुराव चव्हाण | Updated: March 5, 2025 18:06 IST2025-03-05T18:05:15+5:302025-03-05T18:06:07+5:30
पशुसंवर्धन विभागाच्या वतीने बुधवारपासून पाच पथकांच्या माध्यमातून काेंबड्या नष्ट करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

Dharashiv: कावळ्यांनंतर आता कोंबड्यांनाही ‘बर्ड फ्ल्यू’; ढोकीत साडेआठशेंवर कोंबड्या नष्ट
ढाेकी (जि. धाराशिव) : धाराशिव तालुक्यातील ढाेकी येथे कावळ्यांद्वारे ‘बर्ड फ्यू’ धडकल्यानंतर यंत्रणेच्या माध्यमातून परिसरातील १० किमी अंतरावरील गावांतील काेंबड्यांचे सर्वेक्षण करण्यात आले हाेते. यानंतर संशयित काेंबड्यांचे स्वॅब भाेपाळ येथील प्रयाेगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असता अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाच्या वतीने बुधवारपासून पाच पथकांच्या माध्यमातून काेंबड्या नष्ट करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. साेबत पाेलीस कर्मचारीही दिले आहेत.
ढाेकी पाेलीस ठाणे व सुभाष देशमुख यांच्या घराच्या परिसरात २१ फेब्रुवारी राेजी मृतावस्थेतील कावळे आढळून आले हाेते. यानंतर पशुसंवर्धन विभागाने यापैकी दाेन कावळे भाेपाळ येथे तपासणीसाठी पाठविले हाेते. तपासणीअंती ‘बर्ड फ्ल्यू’ या आजाराने त्यांचा मृत्यू झाल्याचे समाेर आले हाेते. यानंतर गावापासून जवळपास १० किमी अंतरातील काेंबड्यांचे सर्वेक्षण करण्यात आले हाेते. एकही काेंबड्यांचे सेड नसले तरी घरगुती साडेआठशेवर काेंबड्या असल्याचे स्पष्ट झाले हाेते. दरम्यान, यापैकी काही काेंबड्यांचा स्वॅब मध्य प्रदेशातील भाेपाळस्थित प्रयाेगशाळेत पाठविला हाेता. मंगळवारी रात्री काेंबड्यांचा अहवाल बर्ड फ्ल्यू पाॅझिटिव्ह आल्यानंतर यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सर्वेक्षणात आढळून आलेल्या तब्बल ८५० हून अधिक काेंबड्या नष्ट करण्यात येणार आहेत. पाच पथकांच्या माध्यमातून हे काम बुधवारपासून सुरू करण्यात आले आहे.
निर्जंतुकीकरणास गती...
कावळ्यांनंतर काेंबड्यांमध्येही बर्ड फ्ल्यू आढळून आल्यानंतर ढाेकी ग्रामपंचायतही अलर्ट झाली आहे. गावांतील सर्व शासकीय कार्यालययांसह शाळा, महाविद्यालये तसेच सार्वजनिक ठिकाणे फवारणीच्या सहाय्याने निर्जंतूक करण्यात येत आहेत. ग्रामस्थांनीही घाबरून न जाता, आवश्यक ती काळजी घ्यावी.
- अमाेल समुद्रे, उपसरपंच, ढाेकी.