परंडा (जि. धाराशिव) : तालुक्यातील कंडारी ते सोनारी रस्त्यावर सोमवारी रात्री ९ ते १० वाजेच्या सुमारास झालेल्या एका संशयास्पद ‘अपघात’मागे खुनाचे गंभीर षडयंत्र असल्याचे उघड झाले आहे. जुन्या भांडणाच्या रागातून दोन मित्रांनी आपल्याच ३५ वर्षीय मित्राच्या डोक्यात जड वस्तूने वार करून क्रूरपणे खून केल्याचा आरोप मयताच्या पत्नीने केला आहे. आंबी पोलिसांनी या घटनेत तत्काळ सूत्रे फिरवत, खुनाचा गुन्हा नोंदवून दोन्ही संशयित आरोपींना रात्रीच ताब्यात घेतले असून, या घटनेमुळे कंडारी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
कंडारी येथील रहिवासी सोनाली मोतीराम जाधव (३५) यांनी आंबी पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. सोनाली यांचे पती मोतीराम जाधव हे सोमवारी रात्री ९.०० वाजेच्या सुमारास कुटुंबासह घरी जेवण करत होते. त्याच वेळी त्यांचे मित्र विष्णू कालिदास तिंबोळे आणि योगेश नागेश तिंबोळे (दोघे रा. कंडारी) हे दुचाकीवरून त्यांच्या घरी आले. त्यांनी मोतीराम यांना ‘‘पप्पू रावखंडे यांच्या बंगल्यावर पार्टी केली आहे, तिकडे जेवण करायला चल’’, असे सांगून त्यांना चालू जेवणाच्या ताटावरून उठवले आणि दुचाकीवर बसवून सोबत घेऊन गेले. रात्री १०.०० वाजेच्या सुमारास मोतीराम यांना घेऊन गेलेल्या दोन मित्रांपैकी विष्णू तिंबोळे हा एकटाच मोतीराम यांच्या घरी परतला आणि त्याने कंडारी ते सोनारी रोडवर पप्पू रावखंडे यांच्या बंगल्यासमोर अपघात झाल्याचे सांगितले.
मयताची पत्नी सोनाली जाधव आणि आई रतन यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असता, मोतीराम जाधव हे रस्त्यावर पडलेले होते. त्यांच्या डोक्याला मोठी दुखापत झाली होती, चेहरा ठेचला गेलेला होता आणि रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रक्त सांडलेले होते. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, काही ठिकाणी सांडलेल्या रक्तावर पाणी आणि माती टाकलेली दिसून आली. ‘अपघात’मध्ये तिघांपैकी केवळ मोतीराम यांचाच अपघात कसा झाला, असा जाब पत्नीने विचारला असता, आरोपी मित्रांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. या परिस्थितीमुळे ‘अपघात’बाबतचा संशय बळावला. सोनाली जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मोतीराम जाधव, विष्णू तिंबोळे आणि योगेश तिंबोळे यांच्यात जुन्या भांडणावरून वाद होता. सदरील भांडण तात्या रावखंडे व पप्पू रावखंडे यांनी सोडवण्याचा प्रयत्नही केला होता, ज्यात तात्या रावखंडे हे जखमी झाले आहेत. जुन्या भांडणाच्या रागातून विष्णू तिंबोळे व योगेश तिंबोळे यांनी मोतीराम जाधव यांच्या डोक्यात जड वस्तूने वार करून त्यांचा खून केला आणि अपघाताचा बनाव करण्याचा प्रयत्न केला, असा गंभीर आरोप फिर्यादीने केला आहे.
पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्नआंबी पोलिसांनी मोतीराम जाधव यांच्या मृत्यू प्रकरणाचा छडा लावत अवघ्या काही तासांत विष्णू तिंबोळे आणि योगेश तिंबोळे यांना अटक केली. रक्तावर माती टाकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याने पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवला आहे. हा घातपात पूर्ववैमनस्यातून झाला का, याचा सखोल तपास सपोनि गोरक्ष खरड करत आहेत.
जाधव यांची निर्घृण हत्यारस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मोतीराम जाधव यांचा चेहरा ठेचलेला असून, डोक्याला गंभीर जखमा आढळल्या. पंचनाम्यात रक्ताचे डाग धुण्याचा व पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न उघड झाला आहे. आंबी पोलिसांनी संशयावरून दोन आरोपींना अटक केली असून, पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
संशय आला अन् बनाव उघड...मोतीराम जाधव यांचा चेहरा ठेचलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. ‘अपघातात’ केवळ मोतीराम यांचाच मृत्यू कसा झाला? या पत्नीच्या प्रश्नावर संशयित मित्रांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने संशय बळावला. घटनास्थळी रक्ताचे डाग पुसून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न उघड झाला असून, पोलिसांनी दोन आरोपींना खुनाच्या आरोपाखाली तत्काळ अटक केली आहे.
Web Summary : In Dharashiv, a staged accident revealed a murder. Friends killed Motiram Jadhav over an old feud, attempting to conceal the crime. Police arrested the suspects, uncovering the plot to destroy evidence at the scene.
Web Summary : धाराशिव में, एक बनावटी दुर्घटना ने हत्या का खुलासा किया। पुराने झगड़े के कारण दोस्तों ने मोतीराम जाधव की हत्या कर दी और अपराध छिपाने की कोशिश की। पुलिस ने आरोपियों को गिरफ्तार कर लिया, घटनास्थल पर सबूत नष्ट करने की साजिश का पर्दाफाश हुआ।