धानुरी गाव सहा दिवस बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:44 IST2021-06-16T04:44:10+5:302021-06-16T04:44:10+5:30

लोहारा : एकीकडे तालुक्यात कोरोनाचे रुग्ण कमी होत असताना धानुरीत मात्र रुग्णसंख्या वाढत असून, तालुक्यात सर्वाधिक रुग्ण ६१ असल्याने ...

Dhanuri village closed for six days | धानुरी गाव सहा दिवस बंद

धानुरी गाव सहा दिवस बंद

लोहारा : एकीकडे तालुक्यात कोरोनाचे रुग्ण कमी होत असताना धानुरीत मात्र रुग्णसंख्या वाढत असून, तालुक्यात सर्वाधिक रुग्ण ६१ असल्याने मेडिकल व दूध डेअरी सोडून सर्व दुकाने सहा दिवस म्हणजेच २० जूनपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे.

लोहारा तालुक्यात गेले आठवडाभरात कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत आहे. त्यात तालुक्यातील आतापर्यंत २५ गावे ही कोरोनामुक्त झाली असून, १९ गावांत बोटांवर मोजण्याइतकेच रुग्ण ॲक्टिव्ह असल्याने हेही कोरोनामुक्तीच्या वाटेवर आहेत. त्यात लोहारा शहरात १७ रुग्ण, तर ग्रामीण भागात १६२ रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. त्यातच प्रशासनाने लावलेले निर्बंध कमी केले जात आहेत. त्यातच तालुक्यातील धानुरीमध्ये मात्र गेले पंधरा दिवसांपासून कासवगतीने कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढत होत आहे. आता तालुक्यात सर्वाधिक ६१ रुग्ण ॲक्टिव्ह धानुरीत आहेत. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून धानुरी ग्रामपंचायतीच्या कार्यालयात सोमवारी माजी जिल्हा परिषद सदस्य ॲड. दीपक जवळगे यांच्या प्रमुख उपस्थितीत सरपंच प्रवीण थोरात, उपसरपंच विठ्ठल बुरटुकणे, शिक्षक आंगणवाडी कार्यकर्ती, आरोग्यसेविका, आशा कार्यकर्ती, पोलीस पाटील व गावातील प्रतिष्ठित नागरिकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत १५ ते २० जून हे सहा दिवस मेडिकल व दूध डेअरी ही दुकाने सोडली तर सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर पहिल्या वेळी पाचशे रुपये दंड व दुसऱ्यांदा उघडे दिसले तर एक हजार रुपये दंड व पुढील १५ दिवसांकरिता दुकान सील करण्यात येणार आहे. तसेच २० जूननंतर दुकानदार, भाजीपाला विक्रेत्यांनी १५ दिवसांच्या आतील कोरोना स्टेटचे प्रमाणपत्र दुकानात दर्शनी ठिकाणी लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. या लावलेल्या कडक निर्बंधांमुळे गावातील रुग्णसंख्या कमी होण्यास मदत मिळणार आहे.

Web Title: Dhanuri village closed for six days