वेळेत माहिती देऊनही पीक विम्याचे कवच मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:29 IST2021-03-07T04:29:09+5:302021-03-07T04:29:09+5:30
कळंब : शेतकऱ्यांना आधार देणाऱ्या पीकविमा योजनेत खासगी कंपनीचा शिरकाव होत प्रक्रिया हायटेक झाली असली, तरी खासगी कंपनीच्या मनमानी ...

वेळेत माहिती देऊनही पीक विम्याचे कवच मिळेना
कळंब : शेतकऱ्यांना आधार देणाऱ्या पीकविमा योजनेत खासगी कंपनीचा शिरकाव होत प्रक्रिया हायटेक झाली असली, तरी खासगी कंपनीच्या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांना अधिकचा मनस्तापच सहन करावा लागत आहे. एककीडे ७२ तासांचा दंडक असताना दुसरीकडे त्या निर्धारित काळात नुकसानीचे ‘इंटिमेन्शन’ देऊनही काही शेतकऱ्यांना अद्यापही ‘कवच’ मिळाले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
हंगाम कोणताही असो, शेती कायम जोखमीची असते. हवामानाच्या अनिश्चिततेचं सावट कायम शेती क्षेत्रावर घोंघावत असते. यामुळेच अलीकडील काळात राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेत आपली पिके विमा संरक्षित करून घेण्यावर भर देतात. दरम्यान, ही योजना ‘हायटेक’ होत असतानाच यामध्ये खासगी कंपन्यांचा शिरकाव झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांनी भरलेल्या प्रीमियमवर राज्य व केंद्र शासन आपल्या हिश्श्याची मोठी रक्कम विमा कंपनीस अदा करत आहे. अशा या कृषी विमा योजनेच्या ‘प्रधानमंत्री फसल विमा’पर्यंतच्या प्रवासात पेरणी ते काढणी पश्चात असे संरक्षण दिल्याने शेतकऱ्यांचा अधिक फायदा होईल अशी आशा धरली जात होती. मात्र, सद्य:स्थितीत यातून केवळ खासगी कंपन्याच ‘मालामाल’ होत असल्याचा अनुभव गत खरिपात आला. परतीच्या पावसाने पिकांचे अतोनात नुकसान झालेले असताना विमा भरपाई मात्र सरसकट दिलेली नाही. सरकारकडून कोट्यवधी रुपयांचा हिस्सा प्राप्त झाला असताना शेतकऱ्यांना देताना मात्र हात आखडता घेतला आहे. यातही ७२ तासांच्या आत नुकसानीची पूर्व सूचना देण्याची जाचक अटक घातली. त्यातही या निर्धारित वेळेत सूचना देऊनही भरपाई दिली नसल्याची प्रकरणे समोर येत आहेत.
तालुक्यातील येरमाळा येथील बळिराम दशरथ कोकाटे यांनी परतीच्या पावसाने आपल्या पिकांचे नुकसान झाल्याची पूर्वसूचना विमा कंपनीकडे वेळेत म्हणजेच ७२ तासांच्या आत दाखल केली होती. त्यानुसार त्यांच्या ०.७७ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याने भरलेल्या ६९३ रुपयांच्या हफ्त्यानुसार संरक्षित रकमेची नुकसान भरपाई मिळणे क्रमप्राप्त होते. मात्र, दुसरा हंगाम तोंडावर आला तरी कोकाटे यांना भरपाई रक्कम मिळालेली नाही. वारंवार पाठपुरावा करूनही व कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करूनही काही उपयोग झालेला नाही.
माहिती दडवल्याने ‘सस्पेन्स’ वाढतोय
तालुका कृषी कार्यालय, संबंधित खासगी कंपन्यांचे कर्मचारी यांच्याकडे शेतकरी विविध तक्रारी मांडतात. यासंबंधी व्यवस्थित माहिती दिली जात नाही. सूचना, प्रचार व प्रसार तर नावालाच आहे. विमा कंपनीचे ‘तालेवर’ कर्मचारी किती लोकांनी विमा भरला, पूर्वसूचना किती लोकांनी दिली, लाभ किती लोकांना मिळाला, अशी साधी माहितीही देत नाहीत. त्यामुळे तक्रार दूर करणे तर फारच दूर आहे.