कर्मचाऱ्यांच्या छळास कंटाळून उपअधीक्षकांची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:45 IST2021-01-08T05:45:21+5:302021-01-08T05:45:21+5:30
तुळजापूर (जि.उस्मानाबाद) : येथील भूमी अभिलेख कार्यालयात कार्यरत असलेल्या उपअधीक्षकांनी तत्कालीन कर्मचाऱ्यांच्या त्रासास कंटाळून राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना ...

कर्मचाऱ्यांच्या छळास कंटाळून उपअधीक्षकांची आत्महत्या
तुळजापूर (जि.उस्मानाबाद) : येथील भूमी अभिलेख कार्यालयात कार्यरत असलेल्या उपअधीक्षकांनी तत्कालीन कर्मचाऱ्यांच्या त्रासास कंटाळून राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मृत्यूपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटच्या आधारे तुळजापूर पोलिसांनी मंगळवारी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तुळजापूर येथील भूमी अभिलेख कार्यालयात पंडित तुकाराम डोईफोडे (५२) हे मागील तीन वर्षांपासून उपअधीक्षक पदावर कार्यरत होते. ते मूळचे माळकोल्हारी (जि. नांदेड) येथील रहिवासी आहेत. तुळजापूर शहरातील एसटी कॉलनी भागात ते एकटेच भाड्याच्या खोलीत वास्तव्य करीत होते. सोमवारी रात्री उशिरा त्यांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. मृत्यूपूर्वी त्यांनी लिहिलेली सुसाईड नोट पंचनाम्यावेळी पोलिसांच्या हाती लागली. याआधारे मयत पंडित डोईफोडे यांचे बंधू मारुती डोईफोडे यांनी तुळजापूर पोलिसांकडे तक्रार दिली. एस. एन. सूर्यवंशी, एस. एस. ढोले, ए. ए. माळी या कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी इतर लोकांसोबत संगनमत करून उपअधीक्षक पंडित डोईफोडे यांच्या खोट्या सह्या करून बनावट कागदपत्रे तयार केली. यामुळे उपरोक्त तिघांवर डोईफोडे यांनी फौजदारी गुन्हे दाखल केले होते. त्याचा राग मनात धरून या कर्मचाऱ्यांनी कार्यालयात जाऊन मारहाण केली. तसेच सातत्याने मानसिक छळ केला. या त्रासास कंटाळून पंडित डोईफोडे यांनी आत्महत्या केल्याचे सुसाईड नोटमध्ये नमूद केले आहे. त्यानुसार या तिघांविरुद्ध मंगळवारी तुळजापूर पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
050121\05osm_2_05012021_41.jpg
मयत पंडीत डोईफोडे, उपाधीक्षक, भूमी अभिलेख, तुळजापूर