कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम ठेवण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:42 IST2020-12-30T04:42:17+5:302020-12-30T04:42:17+5:30
कळंब : कोविड योद्धे म्हणून गौरविलेल्या शासनाच्या विविध विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम ठेवावे, या मागणीसाठी नववर्षाच्या पहिल्या दिवशी ...

कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम ठेवण्याची मागणी
कळंब : कोविड योद्धे म्हणून गौरविलेल्या शासनाच्या विविध विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम ठेवावे, या मागणीसाठी नववर्षाच्या पहिल्या दिवशी थेट मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते संतोष भांडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
कोरोना काळात कंत्राटी स्वरूपात कामावर घेतलेल्या विविध पदांवरील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कोरोना या महाभयंकर रोगाचा समूळ नाश होईपर्यंत किंवा कोविड -१९ हा व्हायरस समूळ नष्ट झाला आहे, असे शासनाने अधिकृतरीत्या घोषित करेपर्यंत राज्यभरातील कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर ठेवावे. राज्य शासनाने आरोग्य विभागातील रिक्त पदांवरील भरती प्रक्रिया राबवत असताना, कोरोना साथरोगात आपल्या प्राणांची बाजी लावून लढणाऱ्या कोरोना योद्ध्यांचे त्या-त्या शैक्षणिक पात्रतेप्रमाणे खाते अंतर्गत परीक्षा घेऊन त्या जागा भराव्यात, अशी मागणी निवेदनात करण्यात आली होती. याबाबत तत्काळ निर्णय नाही झाल्यास १ जानेवारी रोजी मोर्चा काढून मंत्रालयासमोर निदर्शने करण्यात येणार असल्याचे भांडे यांनी यावेळी सांगितले.