विकासकामांच्या पूर्ततेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:33 AM2021-01-25T04:33:32+5:302021-01-25T04:33:32+5:30

कळंब : विविध विकासकामांच्या पूर्ततेसाठी येथील राष्ट्रवादीच्या नगरसेविका छाया बबन अष्टेकर यांनी स्वतःच्या पक्षाच्या नगराध्यक्षाविरुद्ध उपोषण करण्याचा इशारा न. ...

Demand for completion of development works | विकासकामांच्या पूर्ततेची मागणी

विकासकामांच्या पूर्ततेची मागणी

googlenewsNext

कळंब : विविध विकासकामांच्या पूर्ततेसाठी येथील राष्ट्रवादीच्या नगरसेविका छाया बबन अष्टेकर यांनी स्वतःच्या पक्षाच्या नगराध्यक्षाविरुद्ध उपोषण करण्याचा इशारा न. प. प्रशासनाला दिलेल्या निवेदनात दिला आहे. त्यामुळे मुंबई येथे खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर झालेले मनोमिलन फार्स होते का? असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात न. प. ने ई-टॉयलेटचे काम हाती घेतले आहे. या टॉयलेटच्या परिसरात चार स्वछतागृह न.प.ने बांधली आहेत. तसेच या ई-टॉयलेटला काही मंडळींनी विरोध केला आहे. याची दखल घेऊन ई-टॉयलेटची जागा बदलावी, अशी मागणी अष्टेकर यांनी निवेदनात केली आहे. शहरातील प्रभाग क्र.६ व ८ मध्ये सध्या मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला आहे. सार्वजनिक जागांना कचराकुंडीचे स्वरूप आले आहे. बाबानगर, महसूल कॉलनी, वीज वितरण कंपनीसमोरील शिवाजीनगर परिसरात साफसफाई न केल्याने नाल्या तुंबल्या आहेत, डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. याची दखल घेऊन संबंधित कंत्राटदारांना सफाई नियमित करण्याची सूचना देण्याची मागणी अष्टेकर यांनी या निवेदनात केली आहे. प्रभाग क्र. ६ व ८ मधील जवळपास ३५ विकासकामे प्रलंबित असून, ती मार्गी लावावीत, अन्यथा न.प. प्रशासन व नगराध्यक्ष यांच्या विरोधात उपोषण करण्याचा इशारा नगरसेविका अष्टेकर यांनी या निवेदनात दिला आहे.

नगरसेविका अष्टेकर यांनी तीन वेगवेगळे निवेदन देऊन या मागण्या प्रशासनाकडे केल्या आहेत. दरम्यान, दहा-पंधरा दिवसांपूर्वी मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत न.प.मधील दोन्हीही गटांना समोरासमोर बसवून त्यांचे मनोमिलन घडवून आणले होते. राज्यमंत्री संजय बनसोडे यांनीही कळंब येथे येऊन राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष व नगरसेवक यांच्याबरोबर चर्चा केली होती. परंतु, राष्ट्रवादीच्या नगरसेविका अष्टेकर यांनी विकासकामांच्या मुद्द्यावरून नगराध्यक्षांविरोधात उपोषणाचा इशारा दिल्याने मुंबई मनोमिलन हा फार्स होता असे चित्र समोर आले आहे.

Web Title: Demand for completion of development works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.