निजामाला पळता भुई थोडी केलेले दत्तोबा भोसले दुर्लक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:37 IST2021-09-12T04:37:13+5:302021-09-12T04:37:13+5:30
उस्मानाबाद : मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या लढ्यात रझाकारांना पळता भुई थोडी करुन सोडणारे क्रांतीवीर दत्तोबा भोसले यांचा पराक्रम पुरेसा पटलावर आणला ...

निजामाला पळता भुई थोडी केलेले दत्तोबा भोसले दुर्लक्षित
उस्मानाबाद : मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या लढ्यात रझाकारांना पळता भुई थोडी करुन सोडणारे क्रांतीवीर दत्तोबा भोसले यांचा पराक्रम पुरेसा पटलावर आणला गेला नाही. त्यांचा इतिहास शब्दबद्ध होण्यासाठी संशोधन व्हावे, त्यांचे कार्य जगासमोर यावे, यासाठी चर्चासत्र घ्यावे व त्यांचे स्मारक उभारावे, या मागणीसाठी उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यातील सुमारे ७० ग्रामपचायतींनी ठराव घेतले आहेत.
मराठवाड्यातून निजामाला पळवून लावण्यासाठी जिल्ह्यातील अनेक स्वातंत्र्यवीरांनी सशस्त्र लढा उभारला होता. दुर्दैवाने त्यावेळचे अनेक ज्ञात, अज्ञात शूरवीर आजच्या तरूण पिढीला माहिती नाहीत. त्यांच्याबाबतची माहिती, त्यावेळच्या लढ्यांचे प्रसंग, लढ्याचे ठिकाण याचा संपूर्ण इतिहास उलगडून जागतिक पातळीवर पोहोचणे गरजेचे आहे. याच मुक्तिसंग्रामातील एक स्वातंत्र्यसेनानी म्हणजे मातोळा येथील क्रांतीवीर दत्तोबा भोसले. ज्यांची महती व कर्तबगारी १९४८ सालचे उस्मानाबादचे जिल्हाधिकारी महंमद हैदर यांनी त्यांच्या ‘ऑक्टोबर कोअ्प’ पुस्तकातही मांडली आहे. दत्तोबा भोसले हे मुख्य सेनानी होते. जिल्ह्यातील सर्व कॅम्प त्यांनी स्थापन केले व धाडसाने चालवलेही. अशा दत्तोबा भोसले यांची प्रेरणादायी माहिती जगासमोर येणे गरजेचे आहे. उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यात क्रांतीवीर दत्तोबा भोसले यांनी निजामाच्या अन्याय, अत्याचाराविरोधात लढे उभारले. सशस्त्र छावण्या सुरू करून निजामाविरूध्द लढा दिला. त्या काळात देवताळा गावातील थरार, सेलू गावातील हप्ता लूट, नाईचाकूर पोलीस ठाण्यावरील हल्ला सर्वपरिचित आहे. या सर्व बाबी पटलावर आणणे आवश्यक आहे. यासाठी मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिकांची माहिती गोळा करून सरकार दफ्तरी नोंद व्हावी, सशस्त्र लढ्यांची माहिती पुस्तिका तयार करावी. तसेच शालेय अभ्यासक्रमात धड्यांचा समावेश करावा, क्रांतीवीर दत्तोबा भोसले यांचे उस्मानाबाद, लातूर येथे स्मारक उभारावे. शासकीय योजनांना त्यांचे नाव द्यावे, तसेच शासकीय पुरस्कार, क्रीडा संकुल, सभागृह व महामार्गांना त्यांचे नाव द्यावे, अशा विविध मागण्या लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील ७० ग्रामपंचायतींनी केल्या आहेत.