दाेन महिन्यांपूर्वी लाेकवाटा भरला, शेळ्यांचा गट मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:31 IST2021-02-13T04:31:55+5:302021-02-13T04:31:55+5:30
संताप - लाभार्थी मारताहेत कार्यालयाला खेटे तेर : पशुसंवर्धन विभागाच्या वतीने अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी ७५ टक्के अनुदानावर शेळीगट ...

दाेन महिन्यांपूर्वी लाेकवाटा भरला, शेळ्यांचा गट मिळेना
संताप - लाभार्थी मारताहेत कार्यालयाला खेटे
तेर : पशुसंवर्धन विभागाच्या वतीने अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी ७५ टक्के अनुदानावर शेळीगट वाटप केले जातात. त्यानुसार परिसरातील अनेक लाभार्थ्यांनी दाेन महिन्यांपूर्वी लाेकवाटा भरूनही अद्याप शेळीगट मिळालेले नाहीत. त्यामुळे लाभार्थ्यांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे, यासाठी जिल्हा वार्षिक याेजनेतून पशुसंवर्धन विभागाला निधी देण्यात येताे. या निधीतून पात्र लाभार्थ्यांना जवळपास ७५ टक्के अनुदानावर दहा शेळ्या व एक बाेकड (शेळी गट) वितरित केले जाते. या याेजनेचा लाभ मिळावा, म्हणून तालुक्यातील १५ लाभार्थ्यांनी उस्मानाबाद पंचायत समिती पशुसंवर्धन विभागाकडे लाेकवाटा जमा केला. ही रक्कम भरून थाेडेथाेडके नव्हे तर तब्बल दाेन महिन्यांपेक्षा जास्तीचा कालावधी लाेटला आहे. परंतु, अद्याप एकाही लाभार्थ्यास शेळी गट मिळालेला नाही. लाभ मिळण्यास विलंब झाला असल्याने यांतील अनेक लाभार्थी पंचायत समितीतील पशुसंवर्धन विभागात येऊन चाैकशी करीत आहेत. परंतु, त्यांच्याकडूनही समाधान हाेत नाही. त्यामुळे लाभार्थ्यांतून आता नाराजीचा सूर उमटू लागला आहे.
चाैकट...
असे आहे याेजनेचे स्वरूप
जिल्हा नियाेजन समितीच्या माध्यमातून विकास घटक याेजनेअंतर्गत पशुसंवर्धन विभागाला निधी दिला जाताे. या याेजनेतून पात्र लाभार्थ्यांना १० शेळ्या व एक बाेकड असा गट दिला जाताे. या माध्यमातून संबंधित लाभार्थ्यांची आर्थिक उन्नती व्हावी, हा उद्देश आहे.
किती आहे लाेकवाटा?
पशुसंवर्धन विभागाकडून राबविण्यात येत असलेल्या या याेजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना प्रत्येकी १७ हजार ८१० रुपये एवढा लाेकवाटा भरावा लागताे. उस्मानाबाद तालुक्यातील जवळपास १५ लाभार्थ्यांनी हा लाेकवाटा संबंधित विभागाकडे जमा केला आहे.
प्रतिक्रिया...
मी लाेकवाटा भरून जवळपास महिनाभराचा कालावधी लाेटला आहे. भरावयाचे पैसे काहींकडून हातउसने घेतले आहेत. परंतु, अद्याप शेळी गट मिळाला नाही. कार्यालयात जाऊन चाैकशी केली. परंतु, तेथूनही समाधान झाले नाही. याबाबतीत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून गट वाटप करावेत.
- पांडुरंग बागडे, लाभार्थी, तेर.