कोरोना काळात ग्राहक घरातच; ग्राहक मंचात तक्रारी घटल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:35 IST2021-03-09T04:35:20+5:302021-03-09T04:35:20+5:30
उस्मानाबाद : ग्राहकांची फसवणूक झाल्यानंतर त्याला न्याय मिळावा, यासाठी ग्राहक तक्रार निवारण मंच कार्यरत आहे. गेल्या वर्षी कोरोना काळात ...

कोरोना काळात ग्राहक घरातच; ग्राहक मंचात तक्रारी घटल्या
उस्मानाबाद : ग्राहकांची फसवणूक झाल्यानंतर त्याला न्याय मिळावा, यासाठी ग्राहक तक्रार निवारण मंच कार्यरत आहे. गेल्या वर्षी कोरोना काळात ग्राहक मंचातील तक्रारी कमी झाल्या, तरी ग्राहक मंचातील कामकाज अखंडित सुरू आहे. २०१९ च्या तुलनेत दाव्यांची संख्या कमी राहिली. एप्रिल महिन्यात कामकाजावर त्याचा परिणाम झाला. उस्मानाबाद येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीलगतच ग्राहक तक्रार न्याय मंचची इमारत आहे. या इमारतीतूनच ग्राहकांच्या तक्रारी निकाली काढल्या जात असतात. ग्राहक मंचाकडे ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज दाखल करण्यात येत आहेत. ग्राहक मंचच्या अधिकारात वाढ झाल्यापासून ग्राहक मंचकडे तक्रारीचा वेग वाढू लागला आहे. २०१९ या वर्षभरात ४१० तक्रारी दाखल झाल्या होत्या. यातील १८३ प्रकरणे निकाली निघाली होती. २०२० मध्ये २५४ तक्रारी दाखल झाल्या होत्या. पैकी ३७ प्रकरणांचा निपटारा झाला आहे. मार्च महिन्यापासून कोरोनाचे लाॅकडाऊन लागू झाल्याने मार्च महिन्यातील काही दिवस कामकाज ठप्प होते. शिवाय, एप्रिल महिन्यातही कामकाजावर परिणाम झालेला दिसून येतो.
तक्रारी नेमक्या काय
ग्राहक तक्रार निवारण मंचकडे विविध प्रकारच्या तक्रारी ग्राहकांकडून दाखल केल्या जात असतात. या तक्रारी ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने सादर केल्या जातात. उस्मानाबाद जिल्ह्यात शेतकरी वर्गातून कंपन्यांनी बोगस बियाणे माथी मारल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात आहेत.
शिवाय, पीक विमा, प्लॉट, बँकींग, कोटेशन भरुनही विद्युत जोडणी मिळाली नाही. ऑनलाइन फसवणुकीच्या तक्रारीही दाखल झालेल्या आहेत.
पतसंस्थेतील ठेवी मिळेना
ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचात विविध तक्रारी दाखल होतात. यात बँकींग, इन्शुरन्स, महावितरण विभागाच्या तक्रारी मोठ्या संख्येने आहेत. खासगी पतसंस्थेत ठेवलेल्या ठेवी मिळेना झाल्या. प्लॅट खरेदी केला; मात्र तो नावावर होईना. कोटेशन भरुनही लाइन जोडणी मिळेना. अशा तक्रारींचा समावेश आहे.
कोट...
ग्राहक तक्रार निवारण मंचकडे फसवणूक झालेले ग्राहक तक्रारी दाखल करतात. मंचाकडून तक्रारी ६ महिने ते १ वर्षाच्या कालावधीत निकाली काढल्या जात आहेत. कोरोना काळात एप्रिल महिना वगळला तर इतर कालावधीत ग्राहक मंचचे कामकाज अखंडित सुरू आहे. मंचाकडे बँक, इन्शुरन्स, महावितरणच्या तक्रारी अधिक आहेत.
ॲड. मुकुंद सस्ते,
ग्राहक मंच, सदस्य
२०२० मध्ये दाखल तक्रारी
जानेवारी ३४
फेब्रुवारी १८
मार्च २५
एप्रिल ००
मे ००
जून २८
जुलै १८
ऑगस्ट २८
सप्टेंबर २०
ऑक्टोबर ३३
नोव्हेंबर ३२
डिसेंबर १८
२०१९ मधील तक्रारी
दाखल ४१०
निकाली १८३
२०२० मधील तक्रारी
दाखल २५४
निकाली ३७