रोहीत्र बिघाडामुळे पिके जळू लागली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:44 IST2021-01-08T05:44:45+5:302021-01-08T05:44:45+5:30
पारगाव : नादुरुस्त रोहित्रामुळे महिनाभरापासून शेतीतील पिकांना पाणी देणे अशक्य होत आहे. यामुळे सद्यस्थितीत चांगली वाढ झालेली पिके पाण्याअभावी ...

रोहीत्र बिघाडामुळे पिके जळू लागली
पारगाव : नादुरुस्त रोहित्रामुळे महिनाभरापासून शेतीतील पिकांना पाणी देणे अशक्य होत आहे. यामुळे सद्यस्थितीत चांगली वाढ झालेली पिके पाण्याअभावी जळून जात असल्याचे चित्र वाशी तालुक्यातील पारगाव शिवारात आहे.
येथील शिराळकर यांच्या शेतात असलेले विद्युत रोहित्र गेल्या महिनाभरात तीन वेळा जळाले. प्रत्येक वेळी रोहित्र जळाल्यावर ते खासगी मजुराकडून उतरविणे, वाशी येथे खासगी वाहनातून पोहोच करणे, दुरुस्तीनंतर ते परत आणणे व खासगी काम करणाऱ्या मजुराकडून ते बसवून सुरू करणे हा सर्व खर्च शेतकरी वर्गणीद्वारे करतात. हा एकवेळचा खर्च पाच ते सात हजार रुपये होतो. आतापर्यंत तीन वेळा खर्च करूनही पुन्हा रोहित्रात पुन्हा बिघाड झाल्यामुळे केलेला खर्च वाया गेला. सध्या विजेअभावी पिकांना पाणी देणे कठीण होत असून, विहिरी, विंधन विहिरींना मुबलक पाणी असून, पिके जळत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
कोट...........
पारगाव येथील विद्युत रोहीत्र तीन वेळा जळाले आहे. ते ऑफिसला आलेले असून, त्याची रिवाईंडिंग करून लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न केला जात आहे. रोहीत्र तीन वेळेस जळाले असल्याने यावरील नियमानुसार किती कनेक्शन आहेत, हे पाहून तेवढेच चालविण्यासाठी कर्मचाऱ्यांकडून पाहणी केली जाईल. यानंतर वीज पुरवठा कसा मिळेल, यासाठी काम केले जाईल.
- रमेश शेंदरे, वरिष्ठ अभियंता, वाशी.