न लढणाऱ्या शेतकऱ्यांचे पीकविमा कंपन्यांनी हजारो कोटी लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:32 IST2021-04-07T04:32:47+5:302021-04-07T04:32:47+5:30
कळंब : शेतकरी संघटना विम्यासाठी कृषी आयुक्तालय, विमा कंपनीकडे लढत असते. यात विमा कंपनी आंदोलन करणाऱ्या, लढणाऱ्या शेतकऱ्यांनाच पूर्ण ...

न लढणाऱ्या शेतकऱ्यांचे पीकविमा कंपन्यांनी हजारो कोटी लुटले
कळंब
: शेतकरी संघटना विम्यासाठी कृषी आयुक्तालय, विमा कंपनीकडे लढत असते. यात विमा कंपनी आंदोलन करणाऱ्या, लढणाऱ्या शेतकऱ्यांनाच पूर्ण विमा भरपाई देेत असून, इतरांच्या खात्यावर तुटपुंजी रक्कम जमा करते. यातून आवाज न उठविणाऱ्या शेतकऱ्यांचे हजारो कोटी रूपये लुटले जातात. यामुळे शेतकऱ्यांनी लढा दिला पाहिजे, असे आवाहन
शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड यांनी केले.
तालुक्यातील शेलगाव (जहागीर) येथे शेतकऱ्यांची सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. याही वर्षी शेतकरी संघटनेने विविध राज्यस्तरीय आंदोलन केली. यानंतर शासन व कंपन्या खडबडून जाग्या झाल्या आणि राज्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर करण्यास सुरुवात केली. असे असले तरी १५ एप्रिलच्या आत काढणीपूर्व व काढणीपश्चात नुकसानीसाठी देय रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली नाही तर १६ एप्रिल रोजी पुन्हा मंत्रालय किंवा कृषी आयुक्तालय कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचा इशारा गायकवाड यांनी यावेळी दिला. याशिवाय ज्या शेतकऱ्यांना पात्र असतानाही यापूर्वी विमा नुकसान भरपाई मिळाली नाही, त्यांनीही आपल्याशी संपर्क साधावा. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.
सभेच्या अध्यक्षस्थानी बाबुराव तवले होते. शरद भालेकर, मुकिंदा पेजगुडे, किसनराव शिनगारे, उपसरपंच पांडुरंग सोनार, सर्जेराव तवले, केशवराव तवले, जगन्नाथ बांगर, नरहरी मोरे आदींसह शेतकऱ्यांची यावेळी उपस्थिती होती. सूत्रसंचालन नरेश तवले यांनी केले. दत्तात्रय तवले यांनी आभार मानले.