लाचखोर अभियंता, ठेकेदार जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:33 IST2021-01-23T04:33:43+5:302021-01-23T04:33:43+5:30
उस्मानाबाद : जळालेला डीपी बसवून देण्यासाठी शेतक-यांकडून लाच घेणा-या नळदुर्ग ग्रामीण येथील एका अभियंत्यासह, तंत्रज्ञ व शासकीय ठेकेदारावर लाचलुचपत ...

लाचखोर अभियंता, ठेकेदार जाळ्यात
उस्मानाबाद : जळालेला डीपी बसवून देण्यासाठी शेतक-यांकडून लाच घेणा-या नळदुर्ग ग्रामीण येथील एका अभियंत्यासह, तंत्रज्ञ व शासकीय ठेकेदारावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे. पंचासमक्ष लाच घेतलेल्या या तिघांवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे.
महावितरणच्या नळदुर्ग ग्रामीण कार्यालयांतर्गत येणा-या शहापूर वीज उपकेंद्रांतर्गत कृषी पंपांना वीज पुरवठा करणारा एक डीपी जळाला होता. तो बदलून देण्याची मागणी शेतक-र्यांनी उपकेंद्रातील तंत्रज्ञ श्रीकांत साळुंके याच्याकडे केली होती. मात्र, डीपी दुरुस्त होत नसल्याचे सांगून ६३ किलोवॅट ऐवजी १०० किलोवॅटचा डीपी बसवून देण्यासाठी तंत्रज्ञ साळुंके याने शेतक-याकडे १५ हजार रुपये लाचेची मागणी केली. नळदुर्ग ग्रामीणचा सहायक अभियंता हनुमंत अशोक सरडे याने यातील ५ हजार रुपये स्विकारण्याचे मान्य केले. त्यानंतर हा डीपी मिळवून देण्यासाठी शेतक-याना शासकीय ठेकेदार अमित दशरथ उंबरे याने वेगळे ५५ हजार रुपये देण्यास सांगितले. दरम्यान, या सर्व प्रकाराची तक्रार शेतक-यांनी उस्मानाबाद येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधीक्षक प्रशांत संपते यांच्याकडे केली होती. त्यांनी तक्रारीची खात्री करुन उस्मानाबाद एमआयडीसीतील आयुष ट्रान्सफार्मर इंजिनिअरिंग वर्क्स या कंपनीत गुरुवारी सायंकाळी सापळा रचला. ठरल्याप्रमाणे ठेकेदार उंबरे याने शेतक-र्यांकडून ५५ हजार रुपयांची लाच स्विकारली. तेव्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यास रंगेहात ताब्यात घेतले. याप्रकरणी शुक्रवारी सकाळी सहायक अभियंता हनुमंत सरडे, तंत्रज्ञ श्रीकांत साळुंके व ठेकेदार अमित उंबरे या तिघांविरुद्ध आनंदनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांनाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी अटक केली आहे.