खवा, पेढा व्यवसायावर पुन्हा कोरोना संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:34 IST2021-03-09T04:34:52+5:302021-03-09T04:34:52+5:30
(फोटो : अरुण देशमुख ०८) भूम : पहिले लॉकडाऊन बंद होऊन सर्व व्यवसाय सुरळीत सुरू होत असतानाच, मागील पंधरा ...

खवा, पेढा व्यवसायावर पुन्हा कोरोना संकट
(फोटो : अरुण देशमुख ०८)
भूम : पहिले लॉकडाऊन बंद होऊन सर्व व्यवसाय सुरळीत सुरू होत असतानाच, मागील पंधरा दिवसांपासून पुन्हा सर्वत्र कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. याचा परिणाम परत बाजारपेठेवर जाणवू लागला असून, तालुक्यात मोठ्या प्रमाणात चालणाऱ्या खवा, पेढा व्यावसायिकांनादेखील याचा मोठा फटका बसत असल्याचे चित्र आहे. या व्यवसायावर मंदीचे सावट आले असून, भाव कमी होऊन मागणी घटल्याचे चित्र आहे.
तालुक्यातील जांब येथे महादेव विश्वेकर गुळवे व त्यांचे बन्धू श्रीपाद सिद्धेश्वर गुळवे हे अनेक वर्षांपासून खवा-पेढा तयार करण्याचा व्यवसाय करतात. अंत्याधुनिक पद्धतीन कंदी पेढा व दुधापासून तयार होणार खवा ते बनवतात. तसे पाहता तालुक्यात खवा बहुतांश व्यापारी बनवतात. परंतु कंदी पेढा (बरणी पॅकिंग) बनविण्याचा व्यवसाय खूप कमी लोक करतात. त्यातीलच गुळवे बंधू हेही आहेत. त्यांनी एप्रिल २०२० मध्ये पहिले लॉकडाऊन पडल्यानंतर हा व्यवसाय सुरू करून २० कुटुंबांना यातून रोजगार उपलब्ध दिला. मागणीनुसार महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान स्थळांवर त्यांचा हा कंदी पेढा जातो. ‘गुळवे आप्पा पेढा’ म्हणून या पेढ्याची वेगळी ओळख आहे.
गतवर्षी कोरोना संकटामुळे या व्यवसायावर संकट ओढवले होते. कोरोना संकटामुळे गतवर्षीच्या सर्व यात्रा-उत्सवही रद्द करण्यात आले. जवळपास सर्वांचेच खवा, पेढा उत्पादन बंद पडले होते. आता अनलॉकनंतर पुन्हा सर्व व्यवसाय सुरळीत होत असताना मागील महिन्यापासून पुन्हा कोरोनाचे संकट वाढू लागले आहे. त्यामुळे तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी होणारी भाविकांची संख्याही घटली असून, अनेक ठिकाणच्या यात्रा पुन्हा रद्द होत आहेत. पर्यायाने पेढ्यांची मागणीही घटली आहे. वास्तविक देवस्थान खुले झाल्यानंतर ३०० किलो खवा, पेढा बनवावा लागत होता. परंतु मागील महिन्यापासून मागणी घटल्याने ५० ते १५० किलो खवा तयार करण्याची वेळ आली आहे. मागील लॉकडाऊन संपल्यानंतर एक किलो खव्याला २०० ते २५० रुपये भाव मिळत होता. परंतु, आता पुन्हा कोरोनाची रुग्ण संख्या वाढू लागल्याने हा दर पुन्हा १५० ते १६० रुपयांवर आला असल्याचे गुळवे यांनी सांगितले.
कोट.......
मागील महिन्यापासून पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने खवा, पेढ्याची मागणी घटली आहे. भाव कमी झाल्याने किलोमागे १५ ते ३० रुपये नफा मिळत आहे. त्यामुळे आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
- श्रीपाद सिद्धेश्वर गुळवे, खवा व्यापारी, जांब