रेमडेसिविरचा ठणठणाट, ऑक्सिजनही जेमतेम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:30 IST2021-04-15T04:30:59+5:302021-04-15T04:30:59+5:30
उस्मानाबाद : कोरोनाबाधितांवर उपचारासाठी जणू संजीवनीप्रमाणे वापर होत असलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनचा उस्मानाबादेत आधीपासूनच तुटवडा आहे. चढ्या किमतीत इंजेक्शन विकून ...

रेमडेसिविरचा ठणठणाट, ऑक्सिजनही जेमतेम
उस्मानाबाद : कोरोनाबाधितांवर उपचारासाठी जणू संजीवनीप्रमाणे वापर होत असलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनचा उस्मानाबादेत आधीपासूनच तुटवडा आहे. चढ्या किमतीत इंजेक्शन विकून विक्रेते टाळूवरचे लोणी खात आहेत. अशातच आता असमान वितरणाचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्याला तब्बल १० हजार इंजेक्शन उपलब्ध केल्याची घोषणा खुद्द त्यांनीच केली आहे, तर दुसरीकडे उस्मानाबादेत मंगळवारपासूनच ठणठणाट आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या बुधवारी ५ हजारांपार गेली. खासगी रुग्णालयासोबतच जिल्हा रुग्णालयही फुल्ल झाले आहे. दिवसेंदिवस मृत्यू पावणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढते आहे. अशा स्थितीत इंजेक्शनसाठी नातेवाइकांची भटकंती सुरू आहे. मंगळवारी सायंकाळपासूनच उस्मानाबादेत हे इंजेक्शन कोठेही उपलब्ध नव्हते. काही विक्रेत्यांनी ही संधी समजून चढ्या दराने इंजेक्शनची विक्री केली आहे. दुसरीकडे ऑक्सिजनचीही परिस्थिती गंभीर होत चालली आहे. गरजेपुरताच जेमतेम साठा उपलब्ध होत आहे. तुलनेत मागणी वाढत चालली आहे, अशा परिस्थितीत पुरवठ्याबाबत शासनाकडूनही दुजाभाव केला जात असल्याचे समाेर येत आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी सायंकाळी एक ट्विट करून जालना जिल्ह्यासाठी तब्बल १० हजार रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करुन दिल्याचे सांगितले आहे. दुसरीकडे उस्मानाबादेत याच काळात एकही इंजेक्शन उपलब्ध नव्हते. हा दुजाभाव कशासाठी, असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे.
हा दुजाभाव कशासाठी...
जालना जिल्ह्यात १३ एप्रिल रोजी ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ५ हजार ३१३ इतकी होती, तर इकडे उस्मानाबादेत ही संख्या ४ हजार ८५७ इतकी होती. बुधवारी जालना जिल्ह्याला १० हजार रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध झाल्याची माहिती खुद्द आरोग्यमंत्रीच देतात. आता या वितरणाचे नेमके निकष काय ठरवले, हे टोपेच जाणोत.
जिसकी लाठी उसकी भैंस...
इंजेक्शन व ऑक्सिजनच्या बाबतीत सरकारमध्ये जे पावरफुल्ल आहेत, त्यांचीच चलती दिसते. १३ एप्रिल रोजीच शासनाने पुरवठा केलेल्या ऑक्सिजनमध्येही असाच प्रकार समाेर आला आहे. मराठवाड्यात सक्रीय रुग्णसंख्या ही ६४ हजार १५७ इतकी असताना १५१ मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यात आले, तर दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्र व्यापणाऱ्या पुणे विभागात मराठवाड्याच्या दुप्पट म्हणजेच १ लाख ३२ हजार ९१० रुग्ण असताना, तेथे ५७८ मेट्रिक टन ऑक्सिजन देण्यात आले. प्रत्यक्षात तेथील गरज ही २९४ मेट्रिक टनाची दर्शविण्यात आली आहे.
कोट...
इंजेक्शनच्या बाबतीत भयंकर स्थिती आहे. आपण नियमित अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त अभिमन्यू काळे यांच्याकडे पाठपुरावा करीत आहोत. बुधवारीही त्यांच्याकडे वस्तुस्थिती मांडल्यानंतर त्यांनी २२८ इंजेक्शन पाठविण्यात येत असल्याचे सांगितले. मात्र, एकीकडे अशी गंभीर परिस्थिती असताना, सरकारमधील मंत्री आपापल्या भागाचा विचार करीत आहेत. त्यामुळे शासन राज्याचे की, ज्यांच्या-त्यांच्या विभागाचे असा प्रश्न उपस्थित होत आहे.
-राणाजगजीत सिंह पाटील, आमदार, भाजपा