स्वच्छतागृहाचे बांधकाम अपूर्ण; इमारतीचीही झाली दुरावस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:22 IST2021-06-22T04:22:29+5:302021-06-22T04:22:29+5:30
कळंब : ‘माझे कार्यालय, सुंदर कार्यालय’ यासाठी प्रशासन आग्रही असले तरी तालुक्यातील जवळा (खु) येथील अंगणवाडी मात्र या मोहिमेपासून ...

स्वच्छतागृहाचे बांधकाम अपूर्ण; इमारतीचीही झाली दुरावस्था
कळंब : ‘माझे कार्यालय, सुंदर कार्यालय’ यासाठी प्रशासन आग्रही असले तरी तालुक्यातील जवळा (खु) येथील अंगणवाडी मात्र या मोहिमेपासून वंचित राहिली असल्याचे चित्र आहे. या अंगणवाडीची सध्या दुरावस्था झाली असली तरी शासन-प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने ग्रामस्थांत संताप व्यक्त होत आहे.
कळंब तालुक्यातील जवळा (खु) येथील अंगणवाडी क्र. ५१८ ची इमारत २२५ चौरस फूट आकाराची आहे. याच इमारतीमध्ये स्वच्छतागृह बांधण्याचे काम प्रशासनाने मागील वर्षी हाती घेतले. त्यासाठीचे साहित्यही अंगणवाडीमध्ये अजून पडून आहे. परंतु, आजवर ना स्वच्छतागृहाचे बांधकाम पूर्ण झाले ना त्याचे साहित्य संबंधित कंत्राटदाराने बाहेर काढले. त्यामुळे आधीच अपुरी जागा असलेल्या या अंगणवाडीच्या इमारतीत काम करायचे कसे? साहित्य ठेवायचे कोठे? असा प्रश्न अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पडला आहे.
या अंगणवाडीमधून २ गरोदर माता, ५ स्तनदा माता व सहा वर्षांपर्यंत असणाऱ्या गावातील ४१ बालकांना पोषण आहार दिला जातो. अर्धवट बांधकामामुळेे हा पोषण आहार ठेवायचा कुठे, असा प्रश्नही कर्मचाऱ्यांसमोर आहे. हे बांधकाम पूर्ण करा, जागा व्यवस्थित करून द्या, याठिकाणी काम करण्यास अडचण येत आहे, असे गाऱ्हाणे या कर्मचाऱ्यांनी ग्रामपंचायत ते जिल्हा कार्यालयापर्यंत मांडले. मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. ना प्रशासनाने कुठली कार्यवाही केली ना गावातील पुढाऱ्यांनीही पाठपुरावा केला. या अंगणवाडीबरोबरच गावातील इतर अंगणवाडीची अवस्थाही फारशी चांगली नाही. सध्या कोरोना संसर्गामुळे या अंगणवाड्यामध्ये वर्दळ नाही. परंतु, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना इतर दैनंदिन शासकीय कामे अंगणवाडीमध्ये जाऊन करावीच लागतात. परिस्थिती सामान्य झाल्यावर बालके अंगणवाडीमध्ये येणार आहेत. त्यामुळे या अंगणवाडीची दुरुस्ती त्वरित करावी, अशी मागणी जवळावासीयांतून होते आहे.