कोविड-१९ साथ प्रादुर्भावाच्या अनुषंगाने पोषणमूल्ययुक्त आहार घेणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशालेने शालेय पोषण आहार योजनेंतर्गत परसबाग निर्मिती करून विद्यार्थ्यांना सकस आहाराची माहिती दिली, तसेच सकस आहारावर विविध स्पर्धांतून पालक व विद्यार्थ्यांमध्ये जाणीव-जागृती निर्माण करण्यात आली. परसबागेत भोपळा, मिरची, पेरू, सीताफळ बहरली असून, या बागेची पाहणी करून परस बागेचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगण्यात आले.
राष्ट्रीय पोषण महानिमित्त चर्चासत्र, प्रश्नमंजूषा, परसबाग निर्मिती, पोषणमूल्ययुक्त आहार, शारीरिक आणि मानसिक आरोग्य या विषयावर चित्रकला स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, कुपोषणाचे दुष्परिणाम इत्यादी विषयावर ऑनलाइन व ऑफलाइन स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आल्याची माहिती मुख्याध्यापक पद्माकर मोरे यांनी दिली. सेविका वनमाला वाले, सुनीता राठोड, शालेय पोषण आहार मदतनीस कविता केदारे, सुमन साठे, शकुंतला चव्हाण यांच्या परिश्रमांतून ही परसबाग बहरली आहे. शिक्षक बशीर शेख, धनराज तेलंग, बाबासाहेब जाधव, चंद्रशेखर पाटील, सदानंद कुंभार, संजय रूपाजी, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक बाबूराव पवार यांचे याकामी सहकार्य लाभले.