उमरगा : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकामधील स्वातंत्र्यसैनिक स्तंभाची दुरवस्था झाली असून, सद्य:स्थितीत त्यावरील स्वातंत्र्यसैनिकांची नावेही वाचता येत नाहीत. त्यामुळे १७ ऑगस्ट या मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनापूर्वी येथील नावे दुरुस्त करावीत, अशी मागणी माजी सैनिक बालाजी मद्रे व इतरांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.
निजामाच्या अन्यायाविरुद्ध लढा देऊन इतिहास घडविणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण राहावे, यासाठी उमरगा नगर परिषदेसमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ हा स्तंभ उभारण्यात आला. त्यावर स्वातंत्र्यसैनिकांची नावेदेखील लिहिण्यात आली. मात्र, या स्तंभाची सध्या दुरवस्था झाली आहे. या स्तंभावर लिहिलेली नावे ओळखता येत नाहीत. ज्या फरशीवर नावे आहेत त्या फरशीला तडे गेले आहेत. यामुळे हा इतिहास मिटण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे माजी सैनिक बालाजी मद्रे यांनी बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांना स्तंभ दुरुस्तीबाबत लेखी निवेदन दिले.
चौकट........
तहसीलदारांचेही ‘बांधकाम’ला पत्र
दरम्यान, या मागणीची दखल घेत या अनुषंगाने तत्काळ नियमानुसार आवश्यक कार्यवाही करावी, असे पत्र उमरगा तहसीलदारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहे. या पत्राच्या प्रती जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी कार्यालय, पोलीस निरीक्षक यांना देखील देण्यात आल्या आहेत.