राजुरीत उभारले लोकसहभागातून कम्युनिटी आयसोलेशन सेंटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:40 IST2021-07-07T04:40:30+5:302021-07-07T04:40:30+5:30

उस्मानाबाद : तालुक्यातील राजुरी येथील जिल्हा परिषद शाळेत लोकसहभागातून गावपातळीवर सुरू झालेल्या जिल्ह्यातील पहिल्या अत्याधुनिक कम्युनिटी आयसोलेशन सेंटरचे उद्घाटन ...

Community Isolation Center built in Rajuri through public participation | राजुरीत उभारले लोकसहभागातून कम्युनिटी आयसोलेशन सेंटर

राजुरीत उभारले लोकसहभागातून कम्युनिटी आयसोलेशन सेंटर

उस्मानाबाद : तालुक्यातील राजुरी येथील जिल्हा परिषद शाळेत लोकसहभागातून गावपातळीवर सुरू झालेल्या जिल्ह्यातील पहिल्या अत्याधुनिक कम्युनिटी आयसोलेशन सेंटरचे उद्घाटन सोमवारी जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. हनुमंत वडगावे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन देशमुख, गटशिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार, पंचायत समिती सदस्या कुसुमताई इंगळे, नायब तहसीलदार मुस्तफा खोंदे, स्वयंशिक्षण प्रयोग संस्थेच्या नसीम शेख, किरण माने, प्रशांत पाटील, सरपंच मधुकर गळकाटे, पत्रकार महेश पोतदार, उपसरपंच गणेश घोगरे, ग्रामसेवक अश्विनीकुमार पाटील आदी उपस्थित होते. दहा बेडची सोय असलेले हे कम्युनिटी आयसोलेशनन सेंटर तयार करण्यासाठी गावकऱ्यांनी, ग्रामपंचायतीमार्फत लोकसहभागातून पुढाकार घेतला आहे. तसेच स्वयंशिक्षण प्रयोग या सामाजिक संस्थेच्या सहकार्याने आणि जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली हे कम्युनिटी आयसोलेशन सेंटर चालविण्यात येणार आहे.

भविष्यात येणाऱ्या कोरोनाच्या आपत्तीवर मात करण्यासाठी, गाव पातळीवरच समुपदेशन करण्याच्या उद्देशाने हे सेंटर काम करणार आहे. या सेंटरमार्फत प्राथमिक टप्प्यातील कोविड संसर्ग झालेल्या लोकांची काळजी घेतली जाणार असून, होम आयसोलेशनचा सल्ला दिलेल्या रुग्णांना येथे दाखल करून घेण्यात येणार आहे. तसेच कोविड संसर्ग रोखण्यासाठीची प्रतिबंधात्मक उपाययोजना, माहिती, लोकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी समुपदेशन, लसीकरण संबंधित माहिती आणि लसीकरणासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन, तसेच अँटिजन तपासणी देखील करण्यात येणार आहे. गावातील जागरूक तरुणांना रुग्णांच्या काळजीबाबतचे प्राथमिक प्रशिक्षणही येथे देण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे या कम्युनिटी आयसोलेशन सेंटरसाठी राजुरीच्या ग्रामस्थांनी लोकसहभागातून पाणी पुरवठा, दैनंदिन स्वच्छता, रुग्णांना सकस नाश्ता, चहा, जेवण, वीजपुरवठा, इमारतीमध्ये फॅन, ट्यूब, आनंददायी निवासाची सोय, गरम पाणी, टॉयलेट-बाथरूम, तसेच रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे.

तसेच स्वयंशिक्षण प्रयोग या सामाजिक संस्थेने १० बेड, गाद्या, आधुनिक वैद्यकीय उपकरणे, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, इन्व्हर्टर, संगणक, प्रिंटर, थर्मामीटर गन, ऑक्सिमीटर, बीपी मॉनिटर, स्टीमर, टेबल, खुर्च्या, व्हीलचेअर यासारखे रुग्णांना उपयोगी पडणारे साहित्य उपलब्ध करून दिले आहे.

चौकट......

१५ गावांमध्ये करणार सोय

राजुरी येथे उभारण्यात आलेल्या या आयसोलेशन सेंटरसाठी शाळेच्यावतीने चार वर्गखोल्या उपलब्ध करून दिल्या आहेत. या शाळेच्या आवारात ग्रामस्थांनी जोपासलेली वनराई असून, अतिशय निसर्गरम्य वातावरणात हे कम्युनिटी आयसोलेशन सेंटर सुरू करण्यात आल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. संस्थेच्या सहकार्याने उस्मानाबाद जिल्ह्यातील १५ गावात असे आयसोलेशन सेंटर निर्माण करून रुग्णांची सोय केली जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

फोटो कॅप्शन- उस्मानाबाद तालुक्यातील राजुरी येथे गावपातळीवरील कम्युनिटी आयसोलेशन सेंटरचे उद्घाटन करताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हनुमंत वाडगावे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन देशमुख, गटशिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार, नायब तहसीलदार मुस्तफा खोंदे, स्वयंशिक्षण प्रयोग संस्थेच्या नसीम शेख, किरण माने, सरपंच मधुकर गळकाटे आदी.

Web Title: Community Isolation Center built in Rajuri through public participation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.