महावितरणविरोधात ग्राहक मंचात दावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:33 IST2021-04-01T04:33:13+5:302021-04-01T04:33:13+5:30
उस्मानाबाद : शेतकऱ्यांना वेठीस धरुन महावितरणच्या माध्यमातून शासन सक्तीने वीजबील वसूल करीत आहे. त्यासाठी नियमबाह्यपणे वीज पुरवठा खंडित करण्यात ...

महावितरणविरोधात ग्राहक मंचात दावे
उस्मानाबाद : शेतकऱ्यांना वेठीस धरुन महावितरणच्या माध्यमातून शासन सक्तीने वीजबील वसूल करीत आहे. त्यासाठी नियमबाह्यपणे वीज पुरवठा खंडित करण्यात आल्याने आता महावितरणच्या विरोधात ग्राहक मंचात दावे दाखल करण्यासाठी भाजप पुढाकार घेत असल्याची माहिती बुधवारी आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.
महावितरणकडून कधीही शेतकऱ्यांना २४ तास वीज पुरवठा केला जात नाही. रात्री - बेरात्री केवळ ८ तास तोही पुरेशा दाबाने विजेचा पुरवठा होत नाही. रोहित्रे जळाल्यास शेतकरीच स्वखर्चाने ने-आण करतात. दुरुस्तीही महिना-महिना होत नाही. अशी सुमार सेवा देणाऱ्या महावितरणने शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम चालविले आहे. दरम्यान, एकाही शेतकऱ्याने देयक भरल्यास त्यास वीज पुरवठा करणे क्रमप्राप्त आहे. असे असतानाही संपूर्ण रोहित्रेच बंद करुन शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान करण्यात आले आहे. वीज जोडणी न दिल्याने झालेल्या पीक नुकसानीची भरपाई मिळविण्यासाठी आता ग्राहक मंचात शेतकऱ्यांच्या माध्यमातून दावे दाखल करण्यात येणार आहेत. यासाठी रोहित्र, फिडर, सब स्टेशन बंद केल्याने ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले, त्यांनी आपापल्या तालुक्यातील भाजपच्या तालुकाध्यक्षांशी किंवा ८८८८६२७७७७ या क्रमांकावर व्हाॅटस्ॲपवरुन संपर्क साधण्याचे आवाहनही आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे. दरम्यान, सक्तीच्या वीजबिल वसुलीच्या विरोधात महावितरणच्या कार्यालयांसमोर आंदोलने करण्यात आली आहेत. आता प्रत्येक ग्रामपंचायतीसमोर वीजबिल जाळून आंदोलन तीव्र करण्याचे आवाहनही पाटील यांनी शेतकऱ्यांना केले आहे.