व्यापारी महासंघाने वाढविली चुरस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:44 IST2021-01-08T05:44:06+5:302021-01-08T05:44:06+5:30
उमरगा : तालुक्यातील तुरोरी हे व्यापाऱ्यांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. उमरगा शहरापासून अवघ्या सहा किमीवर असलेले मोठे गाव. गेल्या ...

व्यापारी महासंघाने वाढविली चुरस
उमरगा : तालुक्यातील तुरोरी हे व्यापाऱ्यांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. उमरगा शहरापासून अवघ्या सहा किमीवर असलेले मोठे गाव. गेल्या तीस वर्षांपासून या ग्रामपंचायतमध्ये काँग्रेस व शिवसेनेची आलटून पालटून सत्ता राहिली आहे. डिसेंबरमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे पडघम वाजले आणि पक्षीय कार्यकर्त्यांचे आखाडे सुरू झाले. पक्षीय कार्यकर्ते पॅनल बांधणीत व्यस्त असतानाच तुरोरी येथील व्यापारी महासंघानेही स्वतंत्र आघाडी निर्माण करून निवडणुकीत उडी घेतली आहे. त्यामुळे येथे आता सेना-भाजप आणि व्यापारी महासंघ यांच्यात दुरंगी सामना रंगला आहे.
उमरगा तालुक्याची सीमा कर्नाटक राज्याला जुळणारी असून, महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असलेली तालुक्यातील तुरोरी एक मोठी ग्रामपंचायत आहे. व्यापार मोठा असल्याने दोन्ही राज्यातील लहान गावे,वाड्या, तांडे आणि वस्त्यांचा मोठा संपर्क असल्याने आरोग्य, शिक्षण,व्यापार व कृषीविषयक कामानिमित्त इथे येणाऱ्यांचीही संख्या अधिक आहे. येथे दर पाच वर्षाने ग्रामपंचायतमध्ये सत्ताबदल होत असतो. गावात काँग्रेस व शिवसेनेचा मोठा प्रभाव असून, अलिकडच्या काळात भाजपचाही प्रभाव वाढला आहे. मागील पाच वर्षे सत्तेवर असलेल्या सेना-भाजपाकडून या निवडणुकीच्या प्रचारात गावच्या विकासासाठी केलेले नियोजन मांडले जात आहे. तर व्यापारी महासंघानेही पक्षविरहीत पॅनल तयार करून गावच्या पाण्याचा प्रश्न, मूलभूत सुविधांचा अभाव आदी मुद्दे पुढे आणले आहेत. सध्या दोन्ही पॅनलकडून प्रचाराची राळ उठविली असल्याने निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे.
या निवडणुकीत शेवटपर्यंत काँग्रेसचे पॅनल तयार झाले नसल्याने काँग्रेस पक्ष आता कोणामागे आपले बळ लावतो हेही महत्त्वाचे ठरणार आहे. कोणत्या पॅनलमधून कोण येणार, निवडून येण्याची बलस्थाने कोणती आहेत, पूर्वीच्या सदस्यांनी केलेली कामे, याबाबतच्या चर्चा आता गावात सुरू आहेत.
चौकट.....
शिवसेना-भाजप पुरस्कृत सदगुरु उज्ज्वलानंद पॅनलचे पंडित भोसले व विजय शिंदे हे प्रमुख आहेत तर व्यापारी महासंघ पुरस्कृत सद्गुरू काशिनाथ महाराज ग्राम विकास आघाडी पॅनलचे अशोकराव जाधव कारभारी व अभिजीत जाधव माडीवाले हे प्रमुख आहेत. गावात मोठा प्रभाव असलेल्या काँग्रेस पक्षाने पॅनल उभा केला नसल्याने कोणाच्या पाठीशी बळ लावतो, हेही पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
एकूण मतदार ७६००
एकूण प्रभाग ०६
निवडून द्यावयाचे सदस्य १७