अधीक्षक पाटलांना मुख्य अभियंत्यांचा शॉक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:29 IST2021-03-07T04:29:15+5:302021-03-07T04:29:15+5:30
उस्मानाबाद : सध्या महावितरणकडून कृषी योजनेंतर्गत पात्र वीज ग्राहकांकडील वीजबिल वसुलीची मोहीम सुरू आहे. यात उस्मानाबादमुळे मंडळाची कामगिरी खराब ...

अधीक्षक पाटलांना मुख्य अभियंत्यांचा शॉक
उस्मानाबाद : सध्या महावितरणकडून कृषी योजनेंतर्गत पात्र वीज ग्राहकांकडील वीजबिल वसुलीची मोहीम सुरू आहे. यात उस्मानाबादमुळे मंडळाची कामगिरी खराब होत असल्याचा दावा करीत, लातूरच्या मुख्य अभियंत्यांनी येथील अधीक्षक अभियंता श्रीकांत पाटील पाटील यांना धारेवर धरत शुक्रवारी खरमरीत पत्र दिले आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात कृषी योजनेंतर्गत पात्र वीज ग्राहकांची संख्या ही १ लाख ५० हजार ७१० इतकी आहे. या वीज ग्राहकांकडे मार्च, २०२० अखेर १ हजार १०८ कोटी रुपयांची थकबाकी आहे, तसेच सप्टेंबर, २०२० अखेर आणखी ४४ कोटी रुपयांची त्यात चालू बाकीमध्ये भर पडली. एकीकडे थकबाकीची ही रक्कम वाढत चालल्याने महावितरणने सध्या जोरदार वसुली मोहीम सुरू केली आहे. यासाठी जिल्ह्यांना वसुलीची उद्दिष्टेही देण्यात आली आहेत. उस्मानाबाद विभागासाठी ५९८ कोटी रुपयांच्या थकबाकी वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी ५ मार्चपर्यंत या विभागाने केवळ १ कोटी १७ लाख रुपये चालू बिल वसुली केली, तर थकबाकीतील केवळ ९६ लाख वसूल केले आहेत. ५९८ कोटींच्या तुलनेत एकूण केवळ २ कोटी १३ लाख रुपये वसुली करण्यात आली आहे. हे प्रमाण अत्यल्प म्हणजेच ०.३६ टक्के इतके आहे. ही कामगिरी असामाधानकारक असल्याचा ठपका लातूर परिमंडळाचे मुख्य अभियंता रवींद्र कोलप यांनी उस्मानाबादचे अधीक्षक अभियंता श्रीकांत पाटील यांच्यावर ठेवला आहे. वरिष्ठ कार्यालयाने याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे सांगतानाच, कोलप यांनी उस्मानाबादच्या खराब कामगिरीचा लातूर परिमंडळाच्या कामगिरीवर विपरित परिणाम होत असल्याचे नमूद केले आहे. मुख्य अभियंत्यांच्या या खरमरीत पत्रामुळे उस्मानाबाद महावितरणमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा...
उस्मानाबाद विभागाच्या असामाधानकारक वसुलीवर मुख्य अभियंता कोलप यांनी नाराजी व्यक्त करतानाच, अधीक्षक अभियंता श्रीकांत पाटील यांना वसुली वाढविण्यासाठी तातडीने उपाययोजना करून कार्यवाही करण्याची सूचना केली, तसेच सात दिवसांच्या आत या वाईट कामगिरीबाबतचा खुलासा सादर करावा, अन्यथा आपल्यावर शिस्तभंगाची कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल, असा इशाराही कोलप यांनी पाटील यांना दिला आहे.