‘सीईओं’ची वारी, थेट कुटुंबीयांच्या द्वारी...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:33 IST2021-05-12T04:33:49+5:302021-05-12T04:33:49+5:30
कळंब : कोविडच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात पर्यवेक्षक नियुक्त करून प्रत्येक कुटुंबावर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. असे असले, तरी ...

‘सीईओं’ची वारी, थेट कुटुंबीयांच्या द्वारी...
कळंब : कोविडच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात पर्यवेक्षक नियुक्त करून प्रत्येक कुटुंबावर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. असे असले, तरी या कामी कार्यरत यंत्रणा ‘प्रॉपर’ काम करते का, याची खातरजमा करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार फड यांनी थेट गोविंदपूर गाठून येथील दोन कुटुंबीयांच्या दारी पोहोचले.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागातही बाधितांची संख्या झपाट्याने वाढली आहे. यातही लक्षणे असतानाही आजार अंगावर काढण्याची पद्धत ग्रामीण भागात जास्त दिसून येत असल्याने, गंभीर रुग्णांची संख्या अधिक दिसून येत आहे. या अनुषंगाने गावगाड्यातील कोविडचा प्रसार व व्याप्ती ‘ब्रेक’ करणे गरजेचं बनले आहे.
यानुसार, गावात ‘माझ कुटुंब, माझी जबाबदारी’ व ‘माझ गाव, कोरोनामुक्त गाव’ हे विशेष उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचा परिणामकारक अंमल व्हावा, यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार फड यांनी प्रत्येक गावात, प्रत्येकी पन्नास कुटुंबांसाठी एक पर्यवेक्षक व एका गावासाठी एक ग्राम पालक अधिकारी नियुक्त करावा, असे आदेशित केले होते.
याची काही गावांत चांगली अंमलबजावणी होत आहे, तर काही गावात ‘असे तसे’च आहे. यातूनच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार फड यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक स्वरूपात असलेल्या गोविंदपूर गावास मंगळवारी दुपारी अचानक भेट दिली. त्यांनी येथील काही कुंटूब, शाळा, अंगणवाडी, उपकेंद्र यांना भेटी देत कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.व्ही.एच. वडगावे, गट विकास अधिकारी एन.पी. राजगुरू, सीएचओ डॉ मोरे, ग्रामसेवक पी.ए. भानवसे आरोग्यसेविका खंदारे, पोलीस पाटील, एस.के. सुरवसे, ग्राप सदस्या ॲड.भाग्यश्री मुंडे आदी उपस्थित होते.
चाैकट...
कुटुंबाकडे केली खातरजमा...
डॉ.फड यांनी मेनकुदळे व मस्के कुटुंबीयाच्या सदस्यांशी संवाद साधला. कर्मचारी आपल्या घरी येतात का, लक्षणांची विचारणा करतात का, ऑक्सिजन पातळी तपासतात का, स्क्रिनिंग करतात याची चौकशी केली. विशेष म्हणजे, या संदर्भातील रजिस्टर, त्यातील नोंदी व सदस्यांचा जबाब एक येतो का, याचे ‘क्रॉस चेक’ केले. यावेळी त्या कुटुंबीयांनी काम चांगलं होत असल्याचे सांगितले. याशिवाय कुटुंबातील सदस्यांना कोवीडचे निर्देश पाळता का, याविषयी विचारणा केली. तद्नंतर उपकेंद्राला अधिक सतर्क राहण्याच्या तर ग्रापंला वृक्षारोपण व स्वच्छता यावर भर देण्याच्या सूचना दिल्या.
आशाताईकडून केली ऑक्सिजन तपासणी...
गोविंदपूर येथील ग्रामसेवक, डॉक्टर, शिक्षक, शिक्षिका, आरोग्यसेविका, आशाताई, अंगणवाडी ताई यांच्याकडून माहीत घेत त्यांना महत्त्वपूर्ण सूचना ही दिल्या. यानंतर, आशाताई श्रीमती अश्विनी मस्के यांच्याकडील ऑक्सिमीटरच्या माध्यमातून सीईओंनी आपले ऑक्सिजन तपासून घेतले.