आलियाबादवर आता ‘सीसीटीव्ही’ची नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:32 IST2021-04-08T04:32:42+5:302021-04-08T04:32:42+5:30
जळकाेट : उपक्रमशील ग्रामपंचायत म्हणून आलियाबादची ओळख निर्माण झाली आहे. याच बळावर आलियाबाद ग्रामपंचायतीने आजवर अनेक पुरस्कार, बक्षिसे पटकाविली. ...

आलियाबादवर आता ‘सीसीटीव्ही’ची नजर
जळकाेट : उपक्रमशील ग्रामपंचायत म्हणून आलियाबादची ओळख निर्माण झाली आहे. याच बळावर आलियाबाद ग्रामपंचायतीने आजवर अनेक पुरस्कार, बक्षिसे पटकाविली. स्ट्रीटलाइटने गावातील रस्ते उजाळावेत, यासाठी प्रत्येक रस्त्यावर दिवे बसविण्यात आले; परंतु चाेरट्यांनी काही पथदिव्यांच्या बॅटऱ्याच लंपास केल्या. साेबतच लहान-माेठ्या चाेरीच्या घटनाही घडत आहेत. सततचे प्रकार लक्षात घेऊन संपूर्ण गाव ‘सीसीटीव्ही’च्या कक्षेत यावे, यासाठी ग्रामपंचायतीने पुढे येत गावभर सीसीटीव्ही बसवून कार्यान्वित केले आहेत.
तुळजापूर तालुक्यातील आलियाबाद हे साधारपणे दीड हजार लाेकवस्ती असलेले गाव. उपक्रमशील ग्रामपंचायत म्हणून आलियाबादची ओळख निर्माण झाली आहे. सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या याेजनाही या ग्रामपंचायतीकडून पूर्ण क्षमतेने राबविल्या जातात. त्यामुळेच आलियाबाद ग्रामपंचायतीला आजवर निर्मल ग्राम पुरस्कार, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता पुरस्कार, स्मार्ट व्हिलेज पुरस्कार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक एकता पुरस्कार आदी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील अनेक अशा ग्रामपंचायती आहेत, ज्यांना पुरस्कार मिळाल्यानंतर नवनवीन उपक्रमांचा विसर पडल्याचे दिसते; परंतु आलियाबाद ग्रामपंचायत त्यास अपवाद ठरली आहे. काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नवनवीन उपक्रमांची आखणी सुरूच आहे. काही महिन्यांपूर्वीच गावातील सर्वच रस्त्यांवर साेलार पथदिवे बसविण्यात आले हाेते; परंतु अज्ञातांनी सहा ते सात दिव्यांच्या बॅटऱ्याच लंपास केल्या. त्यामुळे संंबंधित रस्ते पुन्हा अंधारात गडून गेले. साेबतच गावात चाेरीच्या लहान- लहान घटनाही घडत हाेत्या. सततचे हे प्रकार लक्षात घेऊन संपूर्ण गावच ‘सीसीटीव्ही’च्या कक्षेत आणण्याचा मुद्दा पुढे आला हाेता. त्यावर जि.प. सदस्य प्रकाश चव्हाण यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. चर्चेअंती निर्णयही झाला आणि थाेडाही विलंब न लावता गावातील प्रमुख चौकात, ग्रामपंचायत कार्यालय परिसर, वाचनालय, मंदिर तसेच प्रमुख रस्त्यांवर ‘सीसीटीव्ही’ बसवून कार्यान्वित करण्यात आले. अशा पद्धतीने संपूर्ण गाव ‘सीसीटीव्ही’च्या कक्षेत आणणारी आलियाबाद ही तालुक्यातील एकमेव ग्रामपंचायत असल्याचा दावा जि.प. सदस्य प्रकाश चव्हाण यांनी केला आहे.
काेट...
दिल्लीच्या धरतीवर संपूर्ण आलियाबाद गाव सीसीटीव्हीच्या कक्षेत आणले आहे. त्यामुळे यापुढे गावात चाेरीच्या घटनांना निश्चित आळा बसू शकेल. साेबतच गावातील साफसफाईच्या कामारही नजर ठेवता येणार आहे. अशा प्रकारे नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणारी आलियाबाद ही तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत असावी.
-ज्याेतिका चव्हाण, सरपंच, आलियाबाद