सावधान, तीन दिवसांत ३४ बालकांना काेराेनाची बाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:40 IST2021-07-07T04:40:02+5:302021-07-07T04:40:02+5:30
उस्मानाबाद - काेराेनाचा संसर्ग काहीअंशी ओसरल्यानंतर शासनाच्या निर्देशानुसार निर्बंध काहीअंशी शिथिल करण्यात आले. असे असतानाच मंगळवारी काेराेना रुग्णांची संख्या ...

सावधान, तीन दिवसांत ३४ बालकांना काेराेनाची बाधा
उस्मानाबाद - काेराेनाचा संसर्ग काहीअंशी ओसरल्यानंतर शासनाच्या निर्देशानुसार निर्बंध काहीअंशी शिथिल करण्यात आले. असे असतानाच मंगळवारी काेराेना रुग्णांची संख्या थेट ९१ वर जाऊन पोहोचली. धक्कादायक बाब म्हणजे यापैकी २२ रुग्ण हे १८ वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. मागील तीन दिवसांत पाॅझिटिव्ह आढळून आलेल्या बालकांची संख्या ३४ वर जाऊन पोहोचली आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांची काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
काेराेनाची पहिली लाट सरते ना सरते, ताेच दुसरी लाट धडकली. ही लाट तीव्र स्वरूपाची असल्याने रुग्णवाढीचा वेग तसेच मृत्यूचे प्रमाणही अधिक हाेते. काेराेनाचा हा वाढता संसर्ग राेखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून निर्बंध शिथिल करण्यात आले, तर दुसरीकडे लसीकरणाचे प्रमाणही वाढविले. आजघडीला लसीकरण झालेल्यांची संख्या सुमारे साडेतीन लाखांवर पाेहाेचली आहे. या सर्व उपाययाेजनांती काेराेनाचा संसर्ग बऱ्यापैकी ओसरला. त्यामुळे शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाकडून निर्बंध काहीअंशी शिथिल केले. परिणामी गर्दीच्या ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंग फारसे गांभीर्याने घेतले जात नाही. मास्कचा वापरही पूर्वीच्या तुलनेत कमी झाला आहे. त्यामुळेच की काय, रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ हाेऊ लागली आहे. ५ जुलैराेजी सुमारे दाेन हजारांवर टेस्ट करण्यात आल्या. यापैकी ९१ जणांचा रिपाेर्ट पाॅझिटिव्ह आला. धक्कादायक बाब म्हणजे, यात बावीस मुलांचा समावेश आहे. ज्यांचे वय १ ते १८ वर्षांच्या आत आहे. एवढेच नाही, तर ३ जुलैराेजीही पाॅझिटिव्ह आलेल्या ५२ पैकी ९ बालके हाेती. ४ जुलै राेजीही तिघा मुलांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला हाेता. एकूणच, मागील तीन दिवसांत एक-दाेन नव्हे, तर तब्बल ३४ बालकांना काेराेनाची लागण झाली आहे. मुलांतील काेराेनाच्या वाढत्या संसर्गाने पालकांसह जिल्हा प्रशासनाची चिंता वाढविली आहे.
चाैकट....
काही बालके २ वर्षांच्या आतील...
जिल्ह्यात ३ ते ५ जुलै या कालावधीत तब्बल १९५ काेराेनाबाधित रुग्ण आढळून आले त्यात ३४ बालकांचा समावेश आहे. यात अनेकांचे वय १ ते २ वर्षे आहे. काहीजण चार ते पाच वयाेगटातील आहेत. उपराेक्त चित्र चिंता वाढविणारे आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांची आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे. पूर्वीच्या तुलनेत काेराेना रुग्णसंख्या कमी असली, तरी धाेका टळलेला नाही.
जिल्ह्यातील एकूण रुग्ण
५८६९९
बरे हाेऊन घरी परतले
५६७६४
उपचार सुरू असलेले रुग्ण
५५९
जिल्ह्यातील एकूण मृत्यू
१३७६