ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवार, प्रतिनिधींच्या कोरोना चाचणीला प्रशासनाचा फाटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:24 IST2021-01-13T05:24:24+5:302021-01-13T05:24:24+5:30
उस्मानाबाद : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या प्रक्रियेत उमेदवारी दाखल करणे, उमेदवारी अर्ज माघारी घेणे, प्रचार, ...

ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवार, प्रतिनिधींच्या कोरोना चाचणीला प्रशासनाचा फाटा
उस्मानाबाद : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या प्रक्रियेत उमेदवारी दाखल करणे, उमेदवारी अर्ज माघारी घेणे, प्रचार, निवडणूक प्रशिक्षण, सभा आदींना मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे दिसून आले; मात्र, यातील अनेकांनी कोरोना नियमांना फाटा दिला होता. असे असले तरी कर्मचारी अथवा उमेदवारांची कोरोना चाचणी झालेली नाही. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणूक काळात कोरोनाचा धोका वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.
जिल्ह्यातील ४२८ ग्रामपंचायतींचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. यातील ४० ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. १५ जानेवारी रोजी होणाऱ्या ३८८ ग्रामपंचायतींचे ७ हजार १०७ उमेदवार रिंगणात आहेत. निवडणूक प्रक्रिया सुरळित पार पडावी, यासाठी जिल्ह्यातील १ हजार २३६ मतदान केंद्रांवर १ केंद्राध्यक्ष इतर तीन सहाय्यक व पोलीस विभागाचा एक कर्मचारी नियुक्त असणार आहे. या कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे ६ हजार १८० इतकी आहे. मात्र, या कर्मचाऱ्यांची,उमेदवारांची कोरोनाची चाचणी झाली नाही. चाचणीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते.
जिल्ह्यात १९४ क्षेत्रीय अधिकाऱ्यांची निवड
जिल्ह्यातील ३८८ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. यात उस्मानाबाद तालुक्यातील ६३, तुळजापूर ४९, उमरगा ३८, लोहारा २१, कळंब ५३, वाशी ३३, भूम ६६, परंडा तालुक्यातील ६५ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. मतदानप्रक्रिया सुरळित पार पडावी यासाठी १९४ क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. शिवाय, ६ हजार १८० मनुष्यबळाचा राबता असणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा विसर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क, सॅनिटायझरचा वापर, तसेच फिजिकल डिस्टन्स आवश्यक आहे. त्याचबरोबर प्रशिक्षण किंवा निवडणुकीत उभ्या असलेल्या उमेदवारांची कोरोना चाचणी होणे गरजेचे आहे. मात्र, प्रशासनाकडून याबाबत कोणतेही पावले उचलली नाहीत. बिनदिक्कतपणे कोरोनाचा नियम पायदळी तुडवून निवडणूक प्रचारासाठी रॅली काढण्यात येत आहेत. निवडणुकीतील कर्मचारीही फारसे गंभीर नसल्याचे चित्र आहे.